सिंधुदुर्ग हादरवणारी घरफोडी अवघ्या २४ तासांत उघड! ३१.५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एका अल्पवयीनासह तरुण जेरबंद

सिंधुदुर्ग हादरवणारी घरफोडी अवघ्या २४ तासांत उघड! ३१.५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एका अल्पवयीनासह तरुण जेरबंद

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग हादरवणारी घरफोडी अवघ्या २४ तासांत उघड! ३१.५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एका अल्पवयीनासह तरुण जेरबंद*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

वेंगुर्ला तालुक्यातील आडारी (टेमबवाडी) येथे झालेल्या थरारक घरफोडीच्या गुन्ह्याचा सिंधुदुर्ग पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांच्या आत यशस्वी उलगडा केला आहे. तब्बल १५ लाख ९७ हजार रुपये किमतीचे ३१.५ तोळे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.
घटनेची पार्श्वभूमी
वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार (गु.र.नं. १५४/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४)), दिनांक १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी १७:३० ते १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १५:३० या कालावधीत आडारी, टेंबवाडी येथील फिर्यादीच्या घराचा दर्शनी दरवाजा कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश करण्यात आला होता. अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातून तब्बल ३१.५ तोळे वजनाचे, १५,९७,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवले होते. या प्रकरणी १४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २१:२५ वाजता वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पथक समांतर तपास करत होते.
घटनास्थळावर मिळालेल्या पुराव्यांचा व तांत्रिक अभ्यास करत श्री. मागाडे यांनी अथक परिश्रम घेतले.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे एका विधीसंघर्षग्रस्त बालकाची ओळख पटली. पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने आपला साथीदार उमेश प्रल्हाद पेडणेकर (वय १८ वर्षे, रा. उभादांडा आडारी, ता. वेंगुर्ला) याच्यासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
मुद्दामाल हस्तगत व पुढील तपास
तपासादरम्यान चोरट्यांकडून चोरीला गेलेल्या दागिन्यांपैकी ११ तोळे सोने फिर्यादीच्या घरातूनच जप्त करण्यात आले आहे. तसेच उर्वरित दागिन्यांपैकी काही सोने एका सोनाराला विकल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार एक लोखंडी हातोडा व एक लोखंडी पारई हस्तगत केली असून, उर्वरित सोन्याच्या दागिन्यांबाबत आणि संबंधित सोनाराबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली खालील अधिकाऱ्यांच्या पथकाने पार पाडली:
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB): पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, ASI सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोझा, आशिष जामदार, पोलीस कॉन्स्टेबल महेश समजिस्कर, अमर कांडर.
वेंगुर्ला पोलीस ठाणे: पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोळकर, हेड कॉन्स्टेबल योगेश सराफदार, पोलीस कॉन्स्टेबल जयेश सरमळकर, मनोज परोळकर, आकाश घाटगे, पंकज पाटील.
पोलिसांच्या या जलद आणि तडाखेबंद कारवाईबद्दल पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!