*कोंकण एक्सप्रेस*
*दुर्गप्रेमींनी केली ऐतिहासिक मनोहरगडाची भ्रमंती*
*२१ सदस्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग*
*शिरगांव : संतोष साळसकर*
वर्षा ऋतुत नयनरम्य कोसळणाऱ्या पर्जन्यसरी, दाट धुके, मनाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि कारवीच्या घनदाट जंगलातून वाट काढत २१ दुर्गप्रेमींनी मनोहर गडाची भ्रमंती केली. वास्तु, अवशेष, महत्त्वपूर्ण ठिकाणांची पाहणी करताना या गडाच्या ऐतिहासिक वैभवाची ओळख झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील या गडाविषयीची माहिती सर्वांना मिळाली.
कुडाळ तालुक्यातील शिवापुर भागात असणाऱ्या या गडाकडे जाण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील शिरसिंगे गोठवेवाडी येथून अगदी जवळचा मार्ग आहे. ठरल्याप्रमाणे या ठिकाणी रविवारी सकाळी सर्वजण एकत्र जमले. आणि गडाकडे जाण्यास निघाले . मजल दरमजल करत अडीच तासानंतर दुर्गप्रेमींनी गड सर केला. या मोहिमेत सहभागी सदस्यांनी मनोहर गडाची संपूर्ण भ्रमंती करत विविध ऐतिहासिक वास्तू, अवशेष व महत्त्वपूर्ण ठिकाणांची पाहणी केली. यावेळी गडाचा इतिहास, त्याचे ऐतिहासिक महत्त्व तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडाच्या भूमिकेविषयी माहिती जाणून घेतली.
दुर्ग मावळा प्रतिष्ठान, सह्याद्री ॲडव्हेन्चर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली–सांगेली तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग अंतर्गत राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू संवर्धन विकास समितीच्या वतीने दुर्गभ्रमंती, वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षीही गडावर कदंब वृक्षांची लागवड करण्यात आली. गडाच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासोबतच गड परिसरातील पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. दुर्गभ्रमंती, ऐतिहासिक माहिती आणि वृक्षारोपण अशा तिहेरी उपक्रमामुळे सहभागी सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
इतिहास, निसर्गाचा अनोखा संगम
इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम साधणारा अनुभव दुर्गप्रेमींनी घेतला. गड संवर्धनाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असा संदेशही देण्यात आला. मनोहर गडाच्या ऐतिहासिक वैभवाची ओळख नव्या पिढीला करून देतानाच गड परिसर हिरवाईने समृद्ध करण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

