दिगवळे बौद्धवाडीत मृत्यूनंतरही यातना..!

दिगवळे बौद्धवाडीत मृत्यूनंतरही यातना..!

*कोंकण एक्सप्रेस*

*दिगवळे बौद्धवाडीत मृत्यूनंतरही यातना..!*

*स्मशानभूमीला शेड नसल्याने ताडपत्रीच्या आड अंत्यसंस्कार*

*प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांचा संताप*

*कणकवली : प्रतिनिधि*

माणसाच्या जीवनातील शेवटचा प्रवासही सन्मानाने व्हावा, अशी अपेक्षा असते. मात्र, कणकवली तालुक्यातील दिगवळे बौद्धवाडी येथे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृत्यूनंतरही यातना सहन करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. स्मशानभूमीला शेड नसल्याने पावसात अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. १० ऑगस्ट रोजी घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिगवळे बौद्धवाडी येथील एका व्यक्तीचे १० ऑगस्ट रोजी निधन झाले. मृत्यूनंतरचे विधी आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थ स्मशानभूमीत पोहोचले. मात्र पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली. स्मशानभूमीला शेड नसल्याने अंत्यसंस्कार करायचे कसे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला.

अखेर ग्रामस्थांनी ताडपत्री धरून पावसापासून मृतदेह आणि अग्नीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. या ताडपत्रीच्या आडच मृतदेहाला अग्नी देत अंत्यसंस्काराची विधी पूर्ण करण्यात आली. मृत व्यक्तीला अंतिम निरोप देतानाही अशा प्रकारची कसरत करावी लागल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केले जात आहे.

विशेष म्हणजे, दिगवळे बौद्धवाडी येथील स्मशानभूमीला शेड उभारून देण्याची मागणी नवीन नाही. यासाठी शासन स्तरावर अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आले. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झाली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

स्मशानभूमी ही कोणत्याही समाजासाठी अत्यावश्यक मूलभूत सुविधा आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी किमान निवारा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना दिगवळे बौद्धवाडीतील नागरिकांना ताडपत्रीच्या आड अंत्यसंस्कार करण्याची वेळ येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आता तरी प्रशासनाचा सुस्त कारभार झटकून दिगवळे बौद्धवाडी येथील स्मशानभूमीला शेड मंजूर करून त्याचे काम तातडीने हाती घेणार का? मृत्यूनंतर तरी व्यक्तीला सन्मानाने अंतिम निरोप मिळणार का? असा सवाल संतप्त ग्रामस्थ आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!