*कोंकण एक्सप्रेस*
*सहकारातून कॉम्प्रेस्ड गॅस प्रकल्प उभारा*
*जमिनी विकू नका; महायुती सरकार रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध – आमदार प्रमोद जठार*
*कणकवली: संजना हळदिवे*
“कोकणातील बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी गावकऱ्यांनी आणि स्थानिकांनी आता रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठी जमिनी विकण्याऐवजी खाजगी कंपन्यांना लीजवर (भाडेतत्त्वावर) द्या. सहकारातून कॉम्प्रेस्ड गॅसनिर्मिती प्रकल्प उभे केल्यास ‘गेल’ (GAIL) सारख्या कंपन्या गॅस खरेदीसाठी तयार आहेत. पालघर ते सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणपट्टीच्या विकासासह रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन भाजपचे संघटक तथा आमदार प्रमोद जठार यांनी केले.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शिवडावचे सरपंच रवींद्र शेट्ये, पंचायत समिती सदस्य बबलू सावंत, भाजप उपाध्यक्ष श्री. जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे व घोषणा:
७० ते ८० टक्के स्थानिक भरतीला प्राधान्य:
कोकणातील तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शिक्षक, महसूल आणि इतर शासकीय विभागांत ७० ते ८० टक्के जागांवर स्थानिकांना प्राधान्य दिले जावे, यासाठी विभागीय संवर्ग पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्याबाबत संबंधित आमदार व संघटनांशी चर्चा झाली आहे.
महसूल प्रक्रियेत सुलभता:
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय अडथळे दूर केले जात आहेत. ‘७०-ब’ चे दावे अवघ्या तीन महिन्यांत निकाली काढण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
दोडामार्गमध्ये ‘वनतारा २’ सारखा प्रकल्प:
दोडामार्ग येथील तिलारी परिसरात पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘वनतारा २’ च्या धर्तीवर प्रकल्प उभारण्यासाठी वनमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे.
औद्योगिक व लोककलाकारांचे प्रश्न:
लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा प्रश्न मिटवण्यासाठी उद्योजकांसोबत बैठक झाली असून, दशावतारी कलाकारांच्या प्रश्नांवरही मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याचे जठार यांनी सांगितले.
पुढील १२ वर्षांत कोकणाच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासासाठी ‘महास्वराज्य अभियाना’अंतर्गत आता सिंधुदुर्ग जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचेही आमदार प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले.

