फळपिक विम्याच्या भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

फळपिक विम्याच्या भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

*कोंकण एक्सप्रेस*

*फळपिक विम्याच्या भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत १० ऑगस्टला मंत्रालयात बैठक*

​*कणकवली : संजना हळदिवे*

पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना २०२५-२६ मधील तांत्रिक त्रुटींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत. या वंचित शेतकऱ्यांना हक्काचे अनुदान मिळावे आणि तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी राज्याचे बंदरे व मत्स्योद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या पुढाकाराने येत्या १० ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी ही माहिती दिली.
​सतीश सावंत यांच्या मागणीला पालकमंत्र्यांचा प्रतिसाद
​जिल्ह्यातील शेतकरी तांत्रिक कारणांमुळे फळपिक विमा अनुदानापासून वंचित राहिल्याची बाब सतीश सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच याप्रकरणी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
​बैठकीस वरिष्ठ अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार
​या बैठकीला कृषी विभागाचे सचिव, कृषी आयुक्त, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांच्यासह भारतीय कृषी विमा कंपनी (नवी दिल्ली) च्या मुख्य महाव्यवस्थापक लावण्या मुंडयूर, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सीएससी (CSC) महाराष्ट्र चे मुख्य व्यवस्थापक वैभव देशपांडे, कृषी विमा कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुंभारे, स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे सीईओ योगेश पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा मनिषा दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत व इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
​या उच्चस्तरीय बैठकीत तांत्रिक त्रुटींवर ठोस तोडगा निघून जिल्ह्यातील सर्व वंचित शेतकऱ्यांना लवकरच नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!