जिल्हाधिकाऱ्यांची व्यापारी व गाळेधारकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा

जिल्हाधिकाऱ्यांची व्यापारी व गाळेधारकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हाधिकाऱ्यांची व्यापारी व गाळेधारकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा*

*नवीन व्यापारी संकुल उभारणीची मागणी*

*तरुण भारतचे मुख्य प्रतिनिधी संदीप गावडे यांचा राजेंद्र मनोहर पेडणेकर ,संजय मालंडकर यांनी केला पुष्पगुच्छ देऊन सत्कार*

*कणकवली : प्रतिनिधी*

अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायत मालकीच्या व्यापारी मार्केटच्या धोकादायक झालेल्या इमारतीच्या पुनर्बांधणीसंदर्भात ज्येष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी समाजसेवक संजय मालंडकर यांच्या समवेत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

यावेळी मार्केटच्या सद्यस्थितीची, इमारतीच्या धोकादायक अवस्थेची तसेच गाळेधारक व खोकेधारकांच्या समस्यांची सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. मागील बैठकीत मागविल्याप्रमाणे इमारतीतील सर्व गाळेधारक व खोकेधारकांची तपशीलवार माहिती असलेली फाईलही यावेळी सादर करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतीच्या मालकीचे जुने व्यापारी मार्केट (पूर्वीचे भाजी मार्केट) अत्यंत जीर्ण झाले असून इमारतीचा स्लॅब, भिंती व छप्पर कोसळण्याच्या स्थितीत आहे. पहिल्या मजल्यावरील काही भाग आधीच कोसळला असून इमारत धोकादायक बनली आहे.

सध्या या मार्केटमध्ये तळमजल्यावरील 13, पहिल्या मजल्यावरील 3 आणि पत्रा शेडमधील 1 असे एकूण 17 गाळेधारक असून 36 खोकेधारक आहेत. या सर्वांची नगरपंचायतीकडे अधिकृत नोंद असून ते नियमितपणे भाडे भरत आहेत. तसेच गेल्या 15 ते 16 वर्षांपासून भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचाही पुनर्वसन करताना विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर लवकरच कणकवली येथे प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

निवेदनाद्वारे धोकादायक इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन व्यापारी संकुल तातडीने उभारण्यात यावे व विद्यमान गाळेधारक व खोकेधारकांना त्यामध्ये प्राधान्याने समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच नवीन संकुलासाठी शासनाच्या नियमानुसार आवश्यक अनामत रक्कम व नवीन भाडे भरण्यास आपण तयार असल्याचेही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

भेटीदरम्यान राजेंद्र मनोहर पेडणेकर व संजय मालंडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेत वेळ दिल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभारही मानले.

यानंतर ओरोस येथील दैनिक तरुण भारत कार्यालयालाही त्यांनी भेट दिली. यावेळी तरुण भारतचे मुख्य प्रतिनिधी संदीप गावडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!