*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्गच्या जागरूक नागरिकांचे नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांना निवेदन*
*केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस करण्याची मागणी..*
*दोडामार्ग:शुभम गवस*
नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी शिफारस भारत सरकारकडे करण्यात यावी, या मागणीसाठी दोडामार्ग तालुक्यातील जागरूक नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट पेपरफुटी प्रकरणासह शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत हे निवेदन देण्यात आले. देशातील लाखो विद्यार्थी व पालकांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटीमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाला मोठा धक्का बसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, आंदोलनकर्त्यांशी सरकारने सकारात्मक संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करावा, शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
तहसीलदारांनी हे निवेदन भारत सरकार व संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे तातडीने पाठवून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नैतिक जबाबदारीबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी शिफारस करावी, अशी विनंती जागरूक नागरिकांनी केली आहे.
यावेळी अॅड. प्रविण नाईक, राजू ठाकूर, संजय गवस, बाबू गवस, सुजन कोरगावकर, विष्णू (सागर) नाईक, मनोहर फक्कोजी देसाई, नंदकुंवर प्रसादी, विष्णू मोहन दळवी, गोविंद शिरोडकर यांच्यासह अनेक जागरूक नागरिकांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून या मागणीला पाठिंबा दर्शविला.

