*नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी गाजणार; महारक्तदान शिबिरासह उड्डाणपुलाखालील सुशोभीकरणाचा होणार शुभारंभ!*

*नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी गाजणार; महारक्तदान शिबिरासह उड्डाणपुलाखालील सुशोभीकरणाचा होणार शुभारंभ!*

*कोंकण एक्सप्रेस*

*नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी गाजणार; महारक्तदान शिबिरासह उड्डाणपुलाखालील सुशोभीकरणाचा होणार शुभारंभ!*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली शहराचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही विविध सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये महारक्तदान शिबिर, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप, वृक्षारोपण आणि शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
​येथील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, लुकेश कांबळे, संतोष पुजारे, सुजित जाधव, प्रा. दिवाकर मुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
​५०० रक्तपिशव्या संकलनाचा संकल्प: कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ शिबिर
​पत्रकार परिषदेत माहिती देताना सुशांत नाईक म्हणाले की, संदेश पारकर नगराध्यक्ष झाल्यानंतरचा हा पहिलाच वाढदिवस आहे. गेली २० वर्षे आम्ही पारकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनीच साजरा करत आलो आहोत. यावर्षी कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल (HPCL) सभागृहात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे ‘कै. सुबोध टिकले’ यांच्या स्मरणार्थ महारक्तदान शिबिर आयोजित केले असून, यात ५०० रक्तपिशव्या संकलित करण्याचा आमचा संकल्प आहे.
​विद्यार्थ्यांना मदत आणि १ हजार वृक्षांचे वाटप
​वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कणकवली शहरात १ हजार वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय, कणकवली नगरपंचायतीच्या वतीने शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार देखील या सोहळ्यात केला जाईल. महिलांसाठी पाककलेसह विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
​विकासकामांचा धडाका; उड्डाणपुलाखालील जागेचे होणार सुशोभीकरण
​”संदेश पारकर यांनी नगराध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून शहरात विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे. कित्येक रखडलेली कामे मंजूर झाली आहेत,” असे सांगत नाईक पुढे म्हणाले की, “या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील महत्त्वपूर्ण विकासकामांचा शुभारंभ केला जाईल. यामध्ये प्रामुख्याने कणकवली शहरातून जाणाऱ्या हायवेच्या उड्डाणपुलाखालील जागेच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. तसेच पारकर यांच्या माध्यमातून ‘गणपती साना’ परिसर देखील सुशोभित करण्यात येणार आहे.”
​कणकवलीवासीयांना उपस्थित राहण्याचे आवाहन:
“सहा महिन्यांपूर्वी कणकवलीच्या जनतेने संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली ‘कणकवली शहर विकास आघाडी’ला मोठ्या विश्वासाने सत्तेत बसवले. नागरिकांच्या या विश्वासाला सार्थ ठरवत आम्ही शहरात उत्तम कामे उभी करत आहोत. या सर्व वाढदिवस संकल्प सोहळ्याला आणि सामाजिक उपक्रमांना कणकवली शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन उपनगराध्यक्ष सुशांत नाईक व सर्व नगरसेवकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!