सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा महावितरणला मोठा फटका; युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा महावितरणला मोठा फटका; युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा महावितरणला मोठा फटका; युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू*

*सिंधुदुर्ग : संजना हळदिवे*

गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे महावितरणच्या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील हजारो खांब कोसळल्याने आणि रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) नादुरुस्त झाल्याने अनेक गावांचा विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, महावितरणने युद्धपातळीवर हालचाली करत बहुतांश भागांत वीज पुरवठा सुरळीत केला आहे.
मोठ्या प्रमाणावर नुकसान आणि दुरुस्तीची प्रगती
वादळामुळे उच्चदाब वाहिनीचे २८२ आणि लघुदाब वाहिनीचे ४१७ खांब जमीनदोस्त झाले होते. याशिवाय २८ रोहित्र बंद पडले होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे आतापर्यंत उच्चदाब वाहिनीचे १९६ आणि लघुदाब वाहिनीचे ३१५ खांब पूर्ववत उभे करण्यात यश आले आहे. नादुरुस्त झालेले सर्व २८ रोहित्र दुरुस्त करून वीज पुरवठा कार्यान्वित करण्यात आला आहे. उरलेले ३६ उच्चदाब आणि १०२ लघुदाब खांब उभे करण्याचे काम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यासाठी अतिरिक्त ५०० खांब उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तालुकानिहाय सुरू असलेले प्रयत्न
सर्वाधिक फटका बसलेल्या दोडामार्ग तालुक्यात १० कंत्राटदार आणि १०० कर्मचाऱ्यांचे पथक रात्रंदिवस काम करत आहे. यासह सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ला येथेही कंत्राटदारांमार्फत दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. कणकवली, वैभववाडी, मालवण व देवगड तालुक्यातील मुख्य गावांचा विद्युत पुरवठा पूर्णपणे सुरळीत करण्यात आला असून, उर्वरित वाड्यांसाठी १२ कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील १६ गावे आणि १२ वाड्यांमधील विद्युत पुरवठा खंडित आहे. महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून हा पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!