निसर्गाच्या नयनरम्य कुशीतील साळशी येथील ‘केगदी धबधबा’ पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित

निसर्गाच्या नयनरम्य कुशीतील साळशी येथील ‘केगदी धबधबा’ पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित

*कोंकण एक्सप्रेस*

*निसर्गाच्या नयनरम्य कुशीतील साळशी येथील ‘केगदी धबधबा’ पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित*

*पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारं सौंदर्यस्थळ*

*शिरगांव : संतोष साळसकर*

कोकणातील सह्याद्री पट्ट्यात अनेक नैसर्गिक धबधबे सध्या वर्षाऋतूत प्रवाहित झालेले दिसतात. अशा या धबधब्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळा सुरू होताच निसर्गाचे खरे सौंदर्य पहावयास मिळते. डोंगराळ प्रदेश, घनदाट जंगल आणि मुसळधार पाऊस यामुळे येथे असंख्य लहान-मोठे धबधबे सजीव होतात. देवगड तालुक्यातील साळशी येथील निसर्गरम्य ‘केगदी धबधबा’ हा त्यापैकीच एक. पर्यटकांच्या नजरेपासून दूर असलेलं, पण निसर्गाने या धबधब्याला भरभरून मोहक सौंदर्य दिले आहे. त्यामुळे या ठिकाणी नक्कीच पर्यटकप्रेमिनी नक्कीच भेट द्यावी.
साळशी गावाला खूप मोठे ऐतिहासिक महत्व आहे. या गावात पुरातनकालीन श्री सिद्धेश्वर व पावणाई देवी अशी दोन मंदिरे आहेत. तर इतरही अनेक मंदिरे आहेत. या गावच्या दक्षिण दिशेला ‘सदानंद गड’ आहे. गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर, साळशी–चाफेड मुख्य रस्त्यावरील सरमळेवाडी येथील श्री देव वटेश्वर–महादेव मंदिराच्या मागे, अवघ्या पाच मिनिटांच्या पायदळी अंतरावर, घनदाट वनराईत हा धबधबा ओसडून वहात आहे. वटवृक्षाच्या छायेखालील पायवाटेने पुढे जाताना धबधब्याचा गडगडाट स्पष्ट ऐकू येतो आणि निसर्गाच्या कुशीत शिरल्याचा अनुभव येतो.
हिरव्या गर्द झाडीतून वाहणारे पाणी काळसर कातळावरून फेसाळत खाली कोसळते, आणि हे दृश्य पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. ‘केगदी’ नावाने ओळखला जाणारा हा धबधबा हंगामी असला तरी त्याचं पावसाळ्यातील रूप अत्यंत मोहक आणि मंत्रमुग्ध करणारं असतं. मात्र या परिसरात पावित्र राखणे आवश्यक आहे.
या धबधब्याजवळ एक बारमाही झरा आहे, तर पश्चिम बाजूस एक प्राचीन ऐतिहासिक तळे आहे. तसेच येथे आढळणारी जैवविविधता, पक्ष्यांचे संचित, औषधी वनस्पती आणि निसर्गशांती यामुळे हा परिसर पर्यावरणदृष्ट्या समृद्ध वाटतो.
याठिकाणी मूलभूत सुविधा, सुरक्षिततेसाठी उपाय आणि पर्यटनविषयक काही योजना राबवल्या गेल्यास ‘केगदी धबधबा’ हे ठिकाण निश्चितच पर्यटकांसाठी आकर्षक पर्यटनस्थळ ठरू शकते. त्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, शासन यांनी नक्कीच या परिसरात येणाऱ्या पर्यटकाना सुविधा द्यावी. जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या नक्कीच वाढेल. अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!