वेळ पडली तर अणुऊर्जा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांना सिंधुदुर्गात आणू-सुशांत नाईक

वेळ पडली तर अणुऊर्जा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांना सिंधुदुर्गात आणू-सुशांत नाईक

*कोंकण एक्सप्रेस*

*वेळ पडली तर अणुऊर्जा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांना सिंधुदुर्गात आणू-सुशांत नाईक*

*अणुऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग मधून हद्दपार करण्याचा आंबा काजू शेतकऱ्यांचा एल्गार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

अणुऊर्जा प्रकल्पामुळे आंबा काजू बागायतदार, मच्छीमार, शेतकरी देशोधडीला लागणार आहे.विनाशकारी प्रकल्प कोकणच्या माथी मारण्याचे काम महायुती सरकार करीत आहे. मात्र अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही असे सांगून पालकमंत्री देवगडच्या जनतेसोबत खोटे बोलत आहेत. परंतु हा प्रकल्प आपण हाणून पाडला पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे एकमेव नेते आहेत ज्यांनी सत्तेत असताना आणि सत्तेत नसतानाही कोकणात विनाशकारी प्रकल्प येऊ दिले नाहीत.त्यांनी बारसु रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध करून तो हद्दपार केला.आता अणुऊर्जा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी जर उद्धवजींना या ठिकाणी आणावं लागलं तरी आम्ही त्यांना आणू आणि कोणत्याही परिस्थितीत हा अणुऊर्जा प्रकल्प हद्दपार करू असे कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांनी ठणकावून सांगितले.

आंबा काजू बागायतदार, देवगड व्यापारी संघ आणि अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आणि आंबा बागायतदारांच्या न्याय मागण्यासाठी देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथे भव्य मेळावा व जलसमाधी आंदोलन आयोजित करण्यात आले.माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख आणि कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांची या आंदोलनाला प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आंबा काजू शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. अणुऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग मधून हद्दपार करण्याचा एल्गार यावेळी आंबा काजू शेतकऱ्यांनी केला.

सुशांत नाईक म्हणाले, आंबा पिकाच्या झालेल्या नुकसानीला पाच लाख रुपये आणि काजू पिकाच्या झालेल्या नुकसानीला तीन लाख रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्याची मागणी आंबा काजू शेतकऱ्यांनी केली होती. मात्र महायुती सरकारने प्रतिकलम २२० रुपये एवढी तुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. एवढेच नव्हे तर देवगडवर अणुऊर्जा प्रकल्प लादला जात आहे. या प्रकल्पाला कोण विरोध करेल त्याला सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे धमकी देत आहेत. पालकमंत्री मात्र अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही असे सांगून देवगडच्या जनतेसोबत ते खोटे बोलत आहेत. कारण या प्रकल्पाचे एमओयू देखील झाले आहेत. या प्रकल्पामुळे आंबा काजू बागायतदार, मच्छीमार, शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. म्हणून आपल्याला आज जलसमाधी आंदोलन करावे लागत आहे.महायुती सरकार हे विनाशकारी प्रकल्प कोकणच्या माथी का मारत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जेव्हा बारसु रिफायनरी प्रकल्प सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आला तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्याला जोरदार विरोध करून तो हद्दपार केला. सत्तेत असताना आणि सत्तेत नसतानाही त्यांनी कोकणात विनाशकारी प्रकल्प येऊ दिले नाहीत. कोकणचे हित जोपासणारे राज्यातील ते एकमेव नेते आहेत. अणुऊर्जा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी जर उद्धवजींना या ठिकाणी आणावं लागलं तरी आम्ही त्यांना आणू आणि कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प हद्दपार करूअसे कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांनी ठणकावून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!