*कोंकण एक्सप्रेस*
*पिकुळे-शेळपीवाडीतील वीजपुरवठा वारंवार खंडित; ग्रामस्थांमध्ये नाराजी..*
*दोडामार्ग :शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे गावातील शेळपीवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पाऊस, वारा किंवा प्रतिकूल हवामान निर्माण होताच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने अनेकदा तासन्तास वीजपुरवठा बंद राहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक काम, घरगुती उपकरणांचा वापर तसेच दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे. नियमित वीजबिले भरूनही वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, वीजवाहिन्यांच्या मार्गात वाढलेल्या झाडांच्या फांद्या व वेलींमुळेही अनेकदा वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत केवळ महावितरण कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनीही सुरक्षिततेचे नियम पाळून झाडांच्या छाटणीसाठी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. वीजवाहिन्यांजवळील धोकादायक झाडे किंवा फांद्यांची माहिती वेळेवर संबंधित वायरमन किंवा महावितरण कार्यालयाला दिल्यास समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
ग्रामस्थांनी पिकुळे-शेळपीवाडी परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना राबविण्याची मागणी केली असून, महावितरण प्रशासनानेही याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

