रस्ता प्रश्नासाठी जीवाची बाजी; उपोषणकर्ते कयतान डिझोजा यांची प्रकृती खालावली…

रस्ता प्रश्नासाठी जीवाची बाजी; उपोषणकर्ते कयतान डिझोजा यांची प्रकृती खालावली…

*कोंकण एक्सप्रेस*

*रस्ता प्रश्नासाठी जीवाची बाजी; उपोषणकर्ते कयतान डिझोजा यांची प्रकृती खालावली…*

*दोडामार्ग : शुभम गवस*

झरे-सरगवे पुनर्वसन परिसरातील प्रलंबित रस्ता प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण बुधवारी अधिक तीव्र झाले. उपोषणकर्ते कयतान डिझोजा यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली असून, त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्ता प्रश्नामुळे पुनर्वसन परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार निवेदने, पाठपुरावा आणि आंदोलन करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की, रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची गैरसोय, रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी तसेच दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, उपोषणकर्ते कयतान डिझोजा यांची प्रकृती खालावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही आणि उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे सहकाऱ्यांनी सांगितले.
प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनाकडे दोडामार्ग तालुक्याचे लक्ष लागले असून, प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!