*कोंकण एक्सप्रेस*
*रस्ता बंद, ग्रामस्थ संतप्त; प्रशासनाविरोधात उपोषण…*
*दोडामार्ग : शुभम गवस*
झरे -२ येथील प्रलंबित रस्ता प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. प्रशासनाने वारंवार आश्वासने देऊनही प्रत्यक्ष कार्यवाही न केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या आंदोलनावेळी रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाज, विद्यार्थ्यांची ये-जा, रुग्णांची वाहतूक आणि शेतीकामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उपोषणकर्त्यांनी खिवणेवाडी ते इझरे-दयानंद पुनर्वसन विभागाला जोडणारा रस्ता तात्काळ खुला करणे, पुनर्वसन परिसरातील कथित अनियमित व्यवहारांची चौकशी करणे तसेच अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत.
मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला असून, या आंदोलनाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

