*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी विशेष पथक गठीत*
*मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे आदेश*
*नगर रचनाकार अक्षता रोळे यांच्याकडे पथकाची जबाबदारी*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली नगरपंचायतीकडून शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी विशेष अतिक्रमण हटाव पथक गठीत करण्यात आले आहे. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले असून नगर रचनाकार अक्षता रोळे यांची पथकाच्या पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या पथकात सहाय्यक म्हणून एकूण १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून शहरातील रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे, फुटपाथवरील अनधिकृत व्यावसायिक स्टॉल, तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी या पथकावर सोपविण्यात आली आहे.
शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी ही मोहीम गांभीर्याने हाती घेतल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आज होणाऱ्या संभाव्य कारवाईकडे शहरवासीयांचे तसेच अतिक्रमणधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.

