*कोंकण एक्सप्रेस*
*मोबाईल रिचार्जचे पैसे परत मिळवून देण्याच्या आमिषाने २.१३ लाखांची ऑनलाइन फसवणूक*
*दोडामार्ग, : शुभम गवस*
मोबाईल रिचार्जचे पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवत दोडामार्ग येथील एका नागरिकाची तब्बल २ लाख १३ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदास गोपाळ मणेरीकर यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. मोबाईल रिचार्जचे १,४९९ रुपये परत मिळणार असल्याचे सांगून संबंधित व्यक्तीने त्यांच्याकडून मोबाईलवर काही प्रक्रिया करून घेतली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यांतून संशयास्पद व्यवहार होऊन २ लाख १३ हजार ५०० रुपये परस्पर काढून घेण्यात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी अशा फसव्या फोन कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

