इंधन तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नका; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

इंधन तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नका; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

*कोंकण एक्सप्रेस*

*इंधन तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नका; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन*

*सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काही काळ इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याची स्थिती होती. मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत.

जिल्हा प्रशासनाने भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOCL) या कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधींशी तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंपधारकांशी सातत्याने संपर्क साधून पुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे इंधनाची उपलब्धता स्थिर करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्यात इंधन टंचाईबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या अफवांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अफवांमुळे अनावश्यक भीती निर्माण होऊन पेट्रोल पंपांवर गर्दी वाढत असून, त्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि इंधन खरेदीसाठी अनावश्यक गर्दी टाळावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!