*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल ; व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह*
*CNG पंपाजवळ पार्किंग नियोजनाचा अभाव*
*वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्या*
*कणकवली ः संजना हळदिवे*
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक दरम्यान रविवारी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वाहतूक कोंडीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत होती.
कणकवली बस स्थानक परिसरातील CNG पंपाजवळ योग्य पार्किंग नियोजन नसल्यामुळे वारंवार वाहतूक कोलमडत असल्याचे चित्र दिसून येते. रविवारी देखील याच कारणामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची रांग लागली होती. विशेष म्हणजे या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका देखील अडकल्या होत्या, ज्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, वाहतूक कोंडी सुरू असतानाही वाहतूक शाखेचे पोलीस पटवर्धन चौकात वाहनांवर दंडात्मक कारवाई करत असल्याचे दिसून आले. वाहतूक सुरळीत करण्याऐवजी दंडात्मक कारवाईवर भर दिला जात असल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने आखलेले वाहतूक नियोजन प्रत्यक्षात केव्हा राबवले जाणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

