*कोंकण एक्सप्रेस*
*करिअर मार्गदर्शनामुळे नोकरी-व्यवसायाची संधी – गोविंद गावडे*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
अणसूर-पाल हायस्कूलमध्ये घेण्यात येणारा प्रेरणा करिअर मार्गदर्शन वर्ग हा उपक्रम स्तुत्य आहे. अशाप्रकारचे मार्गदर्शन वर्ग संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले पाहिजेत. ज्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना नोकरी-व्यवसायाच्या नविन संधी उपलब्ध होतील आणि जिल्हा स्वयंपूर्ण होईल. यासाठी ‘चाणक्य’ क्लासेसचे अविनाश धर्माधिकारी यांचे करिअर मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्याचा आपला मानस असल्याचे प्रतिपादन अणसूर पाल विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी केले.
गतवर्षीपासून अणसू पाल विकास मंडळ-मुंबई, माजी विद्यार्थी आणि अणसूर पाल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने अणसूर पाल हायस्कूलमध्ये ‘प्रेरणा करिअर मार्गदर्शन वर्ग – एक पाऊल भविष्याच्या वाटेवर’ या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. यावर्षी सुद्धा हा उपक्रम 28 एप्रिल रोजी घेण्यात आला. याचे उद्घाटन संस्थेचे सचिव लिलाधर गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अणसूर पाल विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष गोविंद गावडे, शालेय समिती सदस्य दिपक गावडे यांच्यासह प्रमुख व्याख्याते उपस्थित होते.
या करिअर मार्गदर्शन वर्गात सावंतवाडी येथील एस.पी.के. महाविद्यालयाचे प्राध्यापक व जैवविविधता ज्येष्ठ अभ्यासक डॉ.गणेश मर्गज यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून जिल्ह्यातील जैवविविधतेचे दर्शन घडविले आणि याच जैवविविधतेचा पर्यटनाच्या माध्यमातून वापर केल्यास कोकणात निश्चितच पुरेसा व शाश्वत रोजगार मिळणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील नामांकित समुपदेशक व वालावल हायस्कूलचे शिक्षक भाग्यविधाता वारंग यांनी ओघवत्या भाषेत ‘करिअर गायडन्स : एमपीएससी, युपीएससी स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रातील संधी’ यावर मार्गदर्शन केले. वेंगुर्ला पत्रकार संघाचे अध्यक्ष व हायस्कूलचे माजी विद्यार्थी दिपेश परब यांनी ‘वृत्तपत्रे व मिडिया क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी’ यावर व्याख्यान दिले. आपल्याला शाळेत वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे आपण पत्रकारितेकडे वळलो असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. तर संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, गुरूकूल संगित शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व हायस्कूलचे माजी विद्यार्थी दिप्तेश मेस्त्री यांनी ‘संगीत क्षेत्रातील विविध व्यवसाय संधी’ यावर मार्गदर्शन केले. सध्याच्या काळात संगीत क्षेत्र हे रायझिंग क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. फक्त तुमची साधना आणि निष्ठा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सरपंच सत्यविजय गावडे, शालेय समिती सदस्य दिपक गावडे, संस्था सदस्य विजय गावडे, पाल माजी सरपंच वासुदेव बर्वे, साहित्यिक विजय सावंत, शिक्षिका अक्षता पेडणेकर, माजी विद्यार्थी जगन्नाथ गावडे, किरण गावडे, पालक, ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व मार्गदर्शन वर्गाचे व्याख्याते व साहित्यिक विजय सावंत यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सुपारी कलम व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शहराकडे धाव न घेता अणसूर गावातच राहून ‘गजमुख फुडस् प्रॉडक्टच्या’ यशस्वी व्यवसायाद्वारे गावातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे माजी विद्यार्थी गजमुख गावडे यांचा शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या मार्गदर्शन वर्गासाठी विशेष सहकार्य करणारे माजी विद्यार्थी व महालक्ष्मी अॅग्रो प्रॉडक्ट पालचे उद्योजक अंकुश गावडे यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी, सूत्रसंचालन विजय ठाकर यांनी, व्याख्यात्यांची ओळख संचिता परब यांनी तर आभार प्रदर्शन चारूता गावडे यांनी मानले.

