हस्तलिखितांचा ठेवा जपा; माहिती शासनाला कळवा* 

हस्तलिखितांचा ठेवा जपा; माहिती शासनाला कळवा* 

*कोंकण एक्सप्रेस*

*हस्तलिखितांचा ठेवा जपा; माहिती शासनाला कळवा* 

*सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे आवाहन*

*ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला वेग*

*मुंबई, दि. २४ :*

भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् (Gyan Bharatam) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ झाला असून या मोहिमेला आता वेग येत आहे. नागरिक, संस्था किंवा खाजगी संग्राहकांकडे हस्तलिखिते उपलब्ध असल्यास त्यांनी त्याची माहिती ज्ञानभारतम या ॲपद्वारे शासनाला कळवून या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले आहे.

भारताला हस्तलिखितांचा समृद्ध वारसा लाभलेला असून पारंपरिक ज्ञानाची परंपरा या हस्तलिखितांतून पिढ्यान् पिढ्या जपली गेली आहे. मात्र, ही मौल्यवान हस्तलिखिते देशभर विखुरलेल्या स्वरूपात असल्याने त्यांचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने ज्ञानभारतम् प्रकल्पाची आखणी केली असून या माध्यमातून हस्तलिखितांचे सर्वेक्षण, नोंदणी, संवर्धन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यावर भर दिला जात आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच या हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. हस्तलिखितांची मालकी संबंधितांकडेच कायम राहणार असून इच्छुकांनी स्वेच्छेने शासनाकडे सुपूर्द केल्यास ती स्वीकारली जाणार आहेत.

सर्वेक्षणाकरिता ज्ञानभारतम (Gyanbharatam)हे ॲप विकसित करण्यात आले असून हे ॲप वापरण्यास अत्यंत सोपे आहे. या ॲपवर आपल्याकडील हस्तलिखितांची माहिती अपलोड करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असून महाराष्ट्रात विविध विद्यापीठे, संशोधन संस्था, सांस्कृतिक संस्था आणि विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे ही क्लस्टर केंद्रे म्हणून कार्यरत असून आनंद आश्रम संस्थान, पुणे तसेच भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे ही स्वतंत्र केंद्रे म्हणून काम पाहणार आहेत.

महाराष्ट्रासाठी पुराभिलेख संचालनालय, मुंबई ही राज्य नोडल संस्था म्हणून कार्यरत असून राज्य नोडल अधिकारी म्हणून संचालक श्री. सुजितकुमार उगले काम पाहत आहेत. तसेच श्रीमती अंजली ढमाळ या सहनोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

या अभियानाच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय यंत्रणा सक्रिय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था आणि खाजगी संग्राहक यांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

ही मोहिम सांस्कृतिक कार्य विभाग, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र, भारत सरकार, राष्ट्रीय अधुनिक कला केंद्र, सर्व जिल्हाधिकारी यांच्या सहाय्याने राबविण्यात येणार आहे.

तसेच या राष्ट्रीय मोहिमेत शैक्षणिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, स्वयंसेवी संस्था, तसेच NCC, NSS स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!