*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ स्मशानभूमीचा कायापालट : नगरपंचायतीचा उपक्रम*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कोणत्याही शहराच्या विकासाचे मोजमाप तिथल्या सिमेंटच्या रस्त्यांवरून किंवा आलिशान इमारतींवरून केले जाते. परंतु, खऱ्या अर्थाने सुसंस्कृत समाज आणि प्रगल्भ प्रशासन कशाला म्हणतात, याचे उत्तम उदाहरण सध्या कुडाळमध्ये पाहायला मिळत आहे. कुडाळ नगरपंचायतीने शहराच्या स्मशानभूमीमध्ये भगवान शंकराची भव्य मूर्ती उभारून केवळ सौंदर्गीकरणाचा प्रयत्न केलेला नाही, तर एका अत्यंत संवेदनशील आणि अध्यात्मिक कार्यातून जनसामान्यांच्या मनाला उभारी देण्याचा एक प्रेरणादायी पायंडा पाडला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सहसा पाणी, वीज, स्वच्छता आणि रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधांची अपेक्षा केली जाते. मात्र, कुडाळ नगरपंचायतीने या चौकटीबाहेर जाऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे, हे जाणून त्या क्षणी होणाऱ्या दुखाला सावरून घेण्यासाठी एका शांत, दैवी वातावरणाची गरज असते. नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने स्मशानभूमीसारख्या ठिकाणी भगवान शंकराची मूर्ती बसवून दाखवलेली ही दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे.
विकास कामांमध्ये ‘मानसिक स्वास्थ्य’ आणि ‘संस्कृतीचे संवर्धन’ या गोष्टींकडे अनेकदा दुर्लक्ष होते. परंतु, कुडाळ नगरपंचायतीने हा उपक्रम राबवून हे सिद्ध केले आहे की, प्रशासन केवळ भौतिक विकासासाठी नसून, समाजाच्या भावनिक आणि आध्यात्मिक गरजा ओळखून कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. हा उपक्रम म्हणजे प्रशासकीय संवेदनशीलतेचा एक उत्तम नमुना आहे.
भारतीय संस्कृतीत भगवान शंकराला ‘स्मशानवासी’ म्हटले जाते. यामागे एक खोल तत्त्वज्ञान दडलेले आहे. ज्या ठिकाणी जगाचा संपूर्ण अहंकार गळून पडतो, जिथे नात्यांची गुंतागुंत संपते आणि जिथे फक्त ‘सत्य’ उरते, त्या स्मशानात शिव विराजमान आहेत. कुडाळच्या स्मशानभूमीत स्थापित केलेली ही मूर्ती आपल्याला नश्वरतेची जाणीव करून देते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आप्ताला निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत येते, तेव्हा त्यांचे मन विचलित झालेले असते. अशा वेळी समोर शंकराचे ध्यानस्थ, स्थिर आणि अढळ रूप पाहून मनाला आपोआपच शांतता मिळते. ही मूर्ती केवळ पाषाणातून घडवलेली कलाकृती नसून, ती दुःखाच्या सागरात बुडणाऱ्या व्यक्तीसाठी एक आशेचा किरण आहे. मृत्यूला भीतीचे रूप न मानता, त्याला एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून स्वीकारण्याची दृष्टी ही मूर्ती आपल्याला देते.
या मूर्तीचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करताना, आदिशंकराचार्यांच्या परंपरेतील भाव आपल्या मनात जागृत होतो. या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि तिची उपस्थिती हे परिसराच्या ऊर्जेला सकारात्मक वळण देणारी आहे. या मूर्तीचे सार्थ महत्त्व या श्लोकातून दिसून येतेः

