*कोंकण एक्सप्रेस*
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चाललेल्या काळ्याबाजाराचा प्रसाद गावडेंकडून “पर्दापाश”*
*”एनी डेस्क” सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे ठेकेदारच चालवतात टेंडरचा कारभार…!*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
अधिष्ठातांच्या बेजबाबदार कारभाराविरोधात “डीन हटाव- हॉस्पिटल बचाव” जन आंदोलन पुकारणार असल्याचा दिला इशारा
जिल्हा वासियांच्या आरोग्य सेवेची यंत्रणा सक्षमपणे हाकणे अपेक्षित असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील काळ्या बाजाराचा कागदपत्रांनीशी पर्दापाश आज सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंनी ओरोस मुख्यालय येथील आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे. पुणे, सांगली व कोल्हापूर येथील पुरवठादार ठेकेदारच सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज व रुग्णालयाचा प्रशासकीय कारभार चालवत असून कोटींच्या निविदांना प्रसिद्धी देणे,मंजुरी देणे, स्वतःच स्वतःला पात्र ठरवून इतरांना अपात्र करणे असा “भ्रष्ट” कारभार “एनी डेक्स सॉफ्टवेअर” प्रणालीच्या माध्यमातून चालवत असल्याचा आरोप श्री.गावडे यांनी करत पुरावे सादर केले. काही महिन्यांपूर्वी मेडिकल साहित्य खरेदी प्रक्रियेत 62 लाखांच्या निविदाकाराला डावलून 99 लाख रुपयांची निविदा भरणाऱ्या मर्जीतील निविदाकाराला मंजुरी देणाऱ्या टोळीचे कारनामे कागदपत्रांसहित उघड केले असून जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी याकडे आतातरी डोळसपणे पाहण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्राचा व प्रकरणाशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या खुलाशांचा हवाला देत भ्रष्टाचाराचा काळाबाजार नेमका कसा चालतो याचा पाढाच आज पत्रकार परिषदेतून मांडला. भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणा अक्षरशः खिळखिळी केली असून “डीन”च टोळीचा प्रमुख असल्याचा सणसणाटी आरोप देखील त्यांनी पत्राचा आधार घेत केला आहे. वस्त्रधुलाई टेंडर, साहित्य खरेदी, आहार पूरवठा, पुस्तक खरेदी अशा अनेक प्रकरणातील कारनामे ” एनी डेस्क प्रणालीच्या माध्यमातून ” घडवले गेल्याचे उघड केले असून यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री,वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व आयुक्त यांचेकडे रितसर तक्रारी देत अधिष्ठाता व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केल्याचे सांगितले. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मधील 90% कर्मचाऱ्यांच्या डीन विरोधात तक्रारी असून देखील त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती तरं आज जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अशी अधोगतीस गेली नसती, डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने रुग्णांना इतरत्र रेफर करावे लागते, रेफर सेंटर म्हणून शिक्का बसल्याने आता लाजेपोटी पेशंट “डिस्चार्ज” भासवत वेळ मारून नेली जात आहे. यावर डेनने खुलासा देताना पेशंटच्या अशा कोणत्याही तक्रारी नाहीत असा आश्चर्यकारक खुलासा सादर करणे म्हणजे आपत्कालीन काळात पेशंटला आरोग्यसेवा चांगली कशी देता येईल व या परिस्थितीतून कसे बाहेर पडता येईल असा विचार करणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांनी पेशंट बाजूला ठेवून डीनकडे तक्रारी कराव्यात व त्यातच वेळ घालवावा अशी डीनची अपेक्षा आहे का असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. ढासळलेली आरोग्य यंत्रणा व सर्वसामान्य जनतेच्या होणारी गैरसोय पाहता वेळप्रसंगी 1 मे नंतर “डीन हटाव…हॉस्पिटल बचाव” असे नागरी जनआंदोलन पुकारणार असल्याचा इशारा देखील सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते प्रसाद गावडे यांनी पत्रकार परिषदेतून जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

