सुशांत दळवी खूनप्रकरणी सखोल तपासाची मागणी.!*

सुशांत दळवी खूनप्रकरणी सखोल तपासाची मागणी.!*

*कोंकण एक्सप्रेस*

*सुशांत दळवी खूनप्रकरणी सखोल तपासाची मागणी.!*

*कळसुली ग्रामस्थांचे पालकमंत्री नाम. नितेश राणेंना निवेदन.!*

*पोलिसांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना ; असतील तेवढे आरोपी जेरबंद होतील.!*

*पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला विश्वास.!*

*कणकवली ः संजना हळदिवे*

बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांच्या निर्घृण खूनप्रकरणी सखोल व निष्पक्ष तपास करून मुख्य आरोपींना अटक करावी, अशी मागणी कळसुली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २७ मार्च रोजी कणकवली येथे सुशांत दळवी यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असली, तरी खुनाची पद्धत व स्वरूप पाहता हे कृत्य एकट्या व्यक्तीकडून झालेले नसून यात इतरही काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अटक करण्यात आलेल्या आरोपीची शारीरिक स्थिती लक्षात घेता त्याच्याकडून एकट्याने असे कृत्य होणे संशयास्पद असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

तसेच, मुख्य सूत्रधारांनी पोलिसांची दिशाभूल करून सुशांत दळवी यांच्या परिचयातील व्यक्तीलाच या प्रकरणात अडकवले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. केवळ एका आरोपीला अटक करून तपासाला कलाटणी देणे ग्रामस्थांना मान्य नसून, या गुन्ह्याचा सखोल छडा लावून खऱ्या मुख्य आरोपींपर्यंत पोहोचावे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस प्रशासनाला आवश्यक त्या सूचना द्याव्यात व खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधारांना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी या प्रकरणाबाबत आपण सतर्क असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले. कोणालाही सोडले जाणार नाही. सुशांत दळवी हे आमचे अत्यंत जवळचे मित्र होते. त्यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे या प्रकरणात खासदार नारायण राणे यांनीही पोलीस अधीक्षकांना तपासासंदर्भात सूचना दिल्या आहेत. पालकमंत्री म्हणून मी स्वतःही या प्रकरणाची माहिती घेत आहे. योग्य तपास करून सर्व आरोपींना जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी कळसुली ग्रामस्थांना दिला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शीतल दळवी, अतुल दळवी, प्रफुल सुद्रिक, जयवंत गावकर, दिलीप सावंत, सुगंधा दळवी, रुजाय फर्नांडिस, नंदकिशोर परब, स्वप्निल गोसावी, सुशील सावंत, मिलिंद सावंत, मोहित सावंत, प्रथमेश दळवी, शरद सावंत, मारुती दळवी, अमित दळवी, शुभम राऊत, विराज गोसावी, राजा दळवी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!