पालकांनो जागे व्हा, पालकत्वाची जबाबदारी स्वीकारा -मान. दत्तात्रय तवटे

पालकांनो जागे व्हा, पालकत्वाची जबाबदारी स्वीकारा -मान. दत्तात्रय तवटे

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकांनो जागे व्हा, पालकत्वाची जबाबदारी स्वीकारा
-मान. दत्तात्रय तवटे*

*कणकवली ः संजना हळदिवे*

आज विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत तुमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊन आदर्श नागरिक बनवायचे असेल तर त्यांना मोबाईल पासून दूर ठेवा, त्यांच्याशी संवाद साधा, एकत्र येऊन पुस्तके वाचा, त्यांच्या बरोबर खेळा असे उद्गार शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली चे अध्यक्ष श्री दत्तात्रय तवटे यांनी इयत्ता पाचवी ते नववीच्या पालकांना व शिक्षकांना “विद्यार्थ्यांमधली वाढती गुन्हेगारी व पालकत्वाची जबाबदारी” या गंभीर विषयावर मार्गदर्शन करताना काढले. यावेळी त्यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांमधील वाढत्या गुन्हेगारी विषयी सांगितले की भारतात 2023 मध्ये जवळजवळ 14 हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अनेक विद्यार्थी मोबाईलवर बोलत बाईक चालवल्यामुळे अपघातात मृत्यू पावले. शाळांमध्ये लहान लहान वयातील विद्यार्थीची दुसऱ्या विद्यार्थ्यांचा विनयभंग करणे, मानसिक व शारीरिक त्रास देणे अशी प्रकरणे वाढतच आहेत.
या सर्वांचे कारण म्हणजे
आई वडील कामावर गेल्यावर मुलं मोबाईलवर मारामार्या, गोळ्या घालून खून करणे असे विध्वंसक व्हिडिओ गेम खेळतात, वाईट वाईट रिल्स तासनतास बघतात आणि तसेच वागतात. पालक आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत नाही आहेत. पालकांनी कधीतरी मुलांची शाळेची बॅग चेक करा, त्यांच्याशी एकत्र येऊन संवाद साधा, त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना देण्यासाठी त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे न कंटाळता द्या, त्यांच्याबरोबर खेळ खेळा, त्यांना फिरायला न्या. मुलंही आई-वडिलांचे अनुकरण करत असतात म्हणून तुम्हीच कामापुरता मोबाईलचा वापर करा. तुम्ही स्वतःच शिस्तीत रहा मग तुमच्या मुलांना आपोआपच शिस्त लागेल. त्यांना व्यावसायिक व मूल्य शिक्षण द्या. शिक्षणामुळेच ती पुढे स्वावलंबी बनतील व प्रगती करतील तर मूल्य शिक्षणामुळे ते भारताचे चांगले नागरिक बनतील. असे सांगत “पालकांनो, आता जागे व्हा” या शब्दात त्यांनी पालकांना पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आवाहन केले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे यांनीही स्त्री शक्ती विषयी बोलताना सांगितले की आई ही मुलांचा पहिला गुरु असतो. जिजाबाई, सावित्रीबाई, सिंधुताई यांचे दाखले देत आईने जर मुलांमध्ये मूल्य रुजवली, प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले तर हीच मुले पुढे इतिहास रचतील, जग सुंदर बनवतील असे आशादायी उद्गार काढले.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे पर्यवेक्षक अच्युतराव वनवे यांनी केले व आभार प्रदर्शन विलास ठाकूर यांनी मानले. यावेळी जवळजवळ 200 पालक उपस्थित होते. पालकांसाठी असे मार्गदर्शक उपक्रम शाळेत राबविल्याबद्दल त्यांनी प्रशालेच्या मुख्याध्यापकांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!