*कोंकण एक्सप्रेस*
*ठाकर समाजाच्या जात पडताळणीचा प्रश्न अधिवेशनात.!*
*आमदार निलेश राणे यांनी सरकारचे लक्ष वेधले.!*
*कणकवली ः संजना हळदिवे*
ठाकर समाजाला गेली अनेक वर्षे जात पडताळणीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून कागदपत्रे पूर्ण असतानाही त्यांना जात पडताळणीचे दाखले दिले जात नाहीत, असा गंभीर मुद्दा कुडाळ–मालवणचे आमदार यांनी अधिवेशनात उपस्थित केला.
यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले की, ठाकर समाजातील लोकांना एका एका जात पडताळणीच्या दाखल्यासाठी तब्बल दहा-दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. संबंधित अधिकारी या समाजाकडे दुर्लक्ष करत आहे. संबंधित कार्यालय मुंबईत असून सिंधुदुर्ग जिल्हा सुमारे ५०० किमी अंतरावर आहे. त्यामुळे एका जात पडताळणीच्या कामासाठी सिंधुदुर्ग ते मुंबई असा प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच, संबंधित अधिकारी इच्छेनुसार काम करत असल्याचा आरोप करत आमदार निलेश राणे म्हणाले की, अधिकारी मूडमध्ये असेल तरच काम होते. अन्यथा लोकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अधिकाऱ्यांना फोन करूनही कामे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर संबंधित मंत्र्यांना सूचना करताना अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी किंवा त्यांना समज द्यावी, अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकर समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून अधिकाऱ्यांची अशी वागणूक योग्य नसल्याचा सवालही त्यांनी अधिवेशनात उपस्थित केला. योग्य विचार करा अन्यथा भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

