*कोंकण एक्सप्रेस*
*पितृकर्तव्य पार पाडत लेकीने दिला मुखाग्नी ; समाजातील रूढी-परंपरांना दिला छेद*
*विकास नाईक यांचे निधन*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील साळशी येथील रहिवासी विकास दिनकर नाईक (वय ६२) यांचे ८ मार्च रोजी पनवेल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर समाजातील रूढी-परंपरांना छेद देत त्यांची मोठी कन्या सौ. सुचिता भरत फड (पूर्वाश्रमीची सुचिता नाईक) हिने वडिलांना मुखाग्नी देत पितृकर्तव्य पार पाडले. महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि मुलगा-मुलगी समानतेचा संदेश देणारी ही घटना जागतिक महिला दिनाच्या दुसऱ्याच दिवशी घडल्याने परिसरात तिची विशेष चर्चा होत असून सुचिता हिच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विकास नाईक यांचे निधन रविवारी रात्री झाले. त्यांच्यावर सोमवारी पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना मुलगा नसल्याने अंत्यविधीच्या वेळी त्यांची मोठी कन्या सौ. सुचिता हिने पुढाकार घेत पित्यास मुखाग्नी दिला. समाजात आजही अंत्यसंस्काराचा अधिकार केवळ पुरुषांनाच असल्याचा समज प्रचलित असताना सुचिता हिने धाडसाने पुढे येत हा विधी पार पाडला. तिच्या या कृतीतून मुलगा-मुलगी समान आहेत असा प्रभावी संदेश समाजापुढे गेला असून तिच्या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे. “अंत्यसंस्कारांपासून दिवसकार्यापर्यंतचे सर्व विधी माझ्या मुलीच्या हस्ते व्हावेत, अशी वडिलांची इच्छा होती,” असे सुचिता हिने सांगितले.
ते साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई इनाम देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त होते. त्यांचा मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठT होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, एक विवाहित बहीण, तीन मुली, जावई, भावजय, पुतणे व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सोबत फोटो आहे.

