*कोंकण एक्सप्रेस*
*लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांची भूमिका महत्वाची : भगवान लोके*
*कणकवली कॉलेजमध्ये विकसित भारत युवा संसद 2026 उत्साहात संपन्न*
*कणकवली :प्रतिनिधी*
भारतीय लोकशाही जगामधील सर्वात मोठी लोकशाही आहे. लोकशाही सशक्त करण्यासाठी युवकांची भूमिका कायमच महत्वपूर्ण राहिली आहे. विकसित भारत-2047 साठी युवकांनी नेतृत्व करणे, आपली बाजू ठामपणे मांडणे आवश्यक आहे, त्यासाठी युवा संसद सारखे उपक्रम महत्वपुर्ण ठरतील, असे मत कणकवली तालुका पत्रकार संघ, अध्यक्ष भगवान लोके यांनी व्यक्त केले.
कणकवली कॉलेज, कणकवली येथे विकसित भारत युवा संसद-2026 उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर,अपेक्षा मांजरेकर, कार्यक्रम अधिकारी,
माय युवा भारत, सिंधुदुर्ग, डॉ.सुरेश पाटील, डॉ.किरण जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले, युवकांना संसदीय कार्यप्रणालीची माहिती होण्यासाठी युवा संसद सारखे कार्यक्रम महत्वपूर्ण आहेत. या व्यासपीठाचा वापर युवकांनी ‘विकसित भारत 2047’ हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जे त्यांचे विचार आहेत ते सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी करावा असे आवाहन केले.
कार्यक्रम प्रसंगी अपेक्षा मांजरेकर यांनी युवा कनेक्ट आणि माय युवा भारत यामार्फत युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. युवा संसद-2026 कार्यक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हाभरातून 40 पेक्षा जास्त युवक सहभागी झाले. यातून पार्थ कोळमकर, प्रणाली पवार, भार्गवी कवाटकर, प्राची परब आणि संचिता कारवडे यांची राज्यस्तरीय युवा संसद-2026 साठी निवड करण्यात आली.
सर्व यशस्वी युवकांना प्राचार्य युवराज महालिंगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, निवडपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. युवा संसद 2026 साठी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. सोमनाथ कदम, प्रा. डॉ.बालाजी सुरवसे, प्रा. विजय सावंत, संगीता साटम, ॲड. सुधीर गोठणकर यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्रा. वसीम सय्यद, सर्व परीक्षक उपस्थित होते. युवा संसद 2026 सिंधुदुर्ग जिल्हा या कार्यक्रमाचे आयोजन युवा व्यवहार व खेल मंत्रालय आणि संसदीय कार्य मंत्रालय यांच्या र्निर्देशनानुसार क्षेत्रीय संचालक राष्ट्रीय सेवा योजना अजय शिंदे आणि माय भारत सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग कणकवली कॉलेज प्रा. सुरेश पाटील, डॉ. किरण जगताप, प्रा. सागर गावडे, प्रा. पूजा मुंज, आणि प्रा. विद्या मारकड यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा मुंज यांनी केले तर शेवटी आभार डॉ. किरण जगताप यांनी मानले.

