साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाचा पारंपरिक शिमगोत्सव

साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाचा पारंपरिक शिमगोत्सव

*कोंकण एक्सप्रेस*

*साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाचा पारंपरिक शिमगोत्सव*

*धूळ फेकण्याच्या पारंपरिक सोहळ्याने उत्सवाची होते सांगता*

*शिरगांव : संतोष साळसकर*

चौऱ्याऐंशी खेड्यांचा अधिपती आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाचा शिमगोत्सव पारंपरिक रीतिरिवाजांनुसार मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. या शिमगोत्सवाची सांगता गावकोळणीचा लग्नसोहळा आणि धूळ फेकण्याच्या पारंपरिक सोहळ्याने होते.
फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला (सोमवारी ) पारंपरिक पद्धतीने पाच दिवसीय शिमगोत्सवाला सुरुवात झाली . ढोल-ताशांच्या गजरात श्री वशिक तळखंबा मंदिरासमोर तसेच इनामदार श्री पावणाई देवालयासमोर आंब्याच्या झाडाची गाव होळी उभी करण्यात आली . या होळीची ब्राह्मणांकरवी पूजा-अर्चा करून नैवेद्य दाखविण्यात आला . त्यानंतर बारा स्थळांत व इतर ठिकाणीही होळ्या उभ्या केल्या गेल्या .
दुसऱ्या दिवशी सकाळी होळदेवाकडे कौलप्रसादाद्वारे मान्यता घेऊन गाव-घराची रखवाली घेतली गेली . त्यानंतर कौलप्रसादाच्या माध्यमातून येणाऱ्या लोकांच्या अडचणी सोडविण्यात येतात.
दररोज रात्री शिंपी समाजबांधवांच्या वतीने गावकोळीण सजवली जाते. होळीच्या ठिकाणी वग सादर केला जातो आणि मंदिरात पारंपरिक तमाशाचा कार्यक्रम रंगतो. या कलाकृतींमधून लोककला आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडते.परंपरेनुसार गावकोळीण संपूर्ण गावात फिरते
पाचव्या दिवशी सकाळी निशाण व तळीचे पूजन करून ढोल-ताशांच्या गजरात मानकऱ्यांच्या घरी निशाण नेले जाते आणि नंतर संपूर्ण गावात ते फिरवले जाते. रात्री शिंपी समाजबांधवांच्या वतीने इनामदार श्री पावणाई मंदिराच्या सभामंडपात गण, गवळण आणि गावकोळणीचा रंगतदार लग्नसोहळा साजरा केला जातो.
या कार्यक्रमानंतर रात्री १२ वाजल्यानंतर धूळ फेकण्याच्या पारंपरिक सोहळ्याने शिमगोत्सवाची सांगता होते. ग्रामस्थांनी एकत्र येऊन साजरा केलेला हा सोहळा श्रद्धा, उत्साह आणि परंपरेचे प्रतीक असतो.
या उत्सवानंतर चैत्र पौर्णिमेला होळी तोडली जाते. होळीच्या आंब्येरात बांधलेले श्रीफळ वाढवून त्याचा प्रसाद उपस्थितांना वाटप केला जातो. हा प्रसाद ग्रामस्थांसाठी पवित्र मानला जातो.
हा शिमगोत्सव बारा-पाच मानकरी, गावघर आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या सहभागातून व उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!