*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुल्र्यातून जिल्हापरिषदेवर संमिक्ष, तर पंचायत समितीवर महायुतीची सत्ता*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
जिल्हा परिषद वेंगुर्ला तालुक्यात उद्धवसेनेला 2, शिंदेसेना, भाजप आणि अपक्ष यांना एका जागेवर समाधान मानावे लागले. तर वेंगुर्ला पंचायत समितीवर महायुतीची निर्विवाद सत्ता आली आहे. यामध्ये भाजप पुरस्कृत मिळून 6, शिंदेसेनेचे 3 तर अपक्ष 1 अशी पक्षिय बलाबल राहिले. जिल्हापरिषद माजी अध्यक्ष समिधा नाईक तर सदस्य योगिता परब तसेच पंचायत समिती निवडणुकीत माजी सभापती वंदना किनळेकर, निलेश सामंत यांना पराभवाचा धक्का बसला. महायुतीला अंतर्गत बंडखोरीचा फटका बसून तुळस जिल्हापरिषद मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुजाता पडवळ निवडून आल्या.
जिल्हापरिषद निवडणुकीत महायुतीत लढलेल्या भाजपा व शिंदेसेनेला अपेक्षित यश मिळविता आले नाही. मात्र, उद्धवसेनेला दोन जागा मिळविता आल्या असल्या तरी पंचायत समितीमध्ये त्यांना खातेही खोलता आले नाही. एकूणच जिल्हापरिषदेमध्ये सर्वच पक्षांना संमिक्ष यश मिळाले. म्हापण जिल्हापरिषद गटात माजी सभापती अपक्ष उमेदवार वंदना किनळेकर, आडेली जिल्हापरिषद गटात माजी अध्यक्ष समिधा नाईक तसेच तुळस जिल्हापरिषद गटात माजी सदस्य योगिता परब या अनुभवी असूनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, रेडी जिल्हापरिषद गटातून माजी आरोग्य, शिक्षक सभापती प्रितेश राऊळ हे दुस-यांदा विजयी ठरले. तर उभादांडा जिल्हापरिषद गटात भाजपचे मनवेल फर्नांडिस आणि उद्धवसेनेचे संजय गावडे यांच्यात जोरदार राजकीय चर्चेत असलेली लढत एकतर्फी होऊन संजय गावडे तब्बल 1461 मताधिक्यांनी विजयी ठरले.
वेंगुर्ला पंचायत समितीवर म्हापण गणात अपक्ष उमेदवार निकीत राऊळ यांचा पराभव करीत भाजपाचे विष्णू फणसेकर विजयी ठरले. परूळे गणात माजी सभापती भाजपाचे उमेदवार निलेश सामंत यांचा पराभव करीत शिंदेसेनेचे सचिन देसाई 131 मताधिक्यांनी विजयी ठरले. आडेली गणामध्ये अपक्ष उमेदवार जनार्दन कुडाळकर यांचा भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार नितीन मांजरेकर यांनी 221 मताधिक्यांनी पराभव केला. वायंगणी गणामध्ये भाजपाची शितल राऊत यांनी उद्धवसेनेच्या रूतिका माडकर यांच्यावर एकतर्फी विजय मिळविला. तुळस गणामध्ये माजी सभापती सुचिता वजराठकर या दुस-यांदा विजयी झाल्या. मातोंड गणामध्ये भाजपाचे उमेदवार तथा तुळसचे माजी सरपंच शंकर घारे यांनी तुळसचे माजी सरपंच विजय रेडकर यांचा पराभव केला. उभादांडा गणामध्ये शिंदेसेनेचे साक्षी नार्वेकर हिने उद्धवसेनेच्या गंधाली तांडेल यांचा पराभव केला. तर आसोली गणामध्ये भाजपाचे संकेत धुरी हे बिनविरोध निवडून आले. रेडी गणामध्ये भाजपाच्या प्रियांका घाटवळ हिने उद्धवसेनेच्या वंदना कांबळी यांचा पराभव केला. तर शिरोडा गणात माजी उपसभापती सिद्धेश परब यांच्या पत्नी योगिता परब-मसुरकर यांनी शिंदेसेनेच्या महिला तालुका प्रमुख शितल साळगांवकर यांचा पराभव केला. शिरोडा गणामध्ये एकही मत नोटाला पडले नाही.
जिल्हापरिषद गटामध्ये उद्धवसेनेला मोठे यश मिळाले असले तरी पंचायत समितीमध्ये मात्र खातेही खोलता आले नाही. निकाल जाहीर होताच संबंधित राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकत्र्यांनी उमेदवारांचे पुष्पहार आणि गुलाल उधळून अभिनंदन केले. फटाक्यांची आतषबाजी करीत डीजेच्या तालावर फेर धरला मिरवूणकही काढली.

