पर्यटनाच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्याला विकासाच्या मार्गावर..

पर्यटनाच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्याला विकासाच्या मार्गावर..

*कोंकण एक्सप्रेस*

*पर्यटनाच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्याला विकासाच्या मार्गावर..!*

*वेंगुर्ले प्रतिनिधी : प्रथमेश गुरव*

पर्यटनाच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्याबाबत एक अजेंडा महायुती म्हणून आम्ही निश्चित केला आहे. तालुक्यातील ५ जिल्हा परिषद आणि १० पंचायत समितीच्या जागांवर महायुतीने अधिकृत उमेदवार दिले असून प्रचारामध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या जाहीर सभा पाचही जिल्हा परिषद मतदार संघात उद्या सोमवार व परवा मंगळवारी होणार आहेत. त्यावेळी महायुतीचे पदाधिकारी ही उपस्थित असणार आहेत, अशी माहिती महायुतीतर्फे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपा वेंगुर्ले कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी मनीष दळवी, सचिन वालावलकर यांच्यासह शिव जिल्हा संघटक सुनील डूबळे, भाजपा तालुका अध्यक्ष पप्पू परब, माजी उपसभापती सुनील मोरजकर, पंकज शिरसाट आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मनीष दळवी म्हणाले की निवडणुक प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. महायुतीच्या सर्वच उमेदवारांना प्रत्येक गावात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पदाधिकारी कार्यकर्तेही एक दिलाने प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे महायुतीच्या तालुक्यातील सर्व जागांवरील उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील याची खात्री आम्हाला आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदार संघात पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या संयुक्त सभा आयोजित केले आहेत. उद्या सोमवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता परुळे येथे तर रात्री ८.३० वाजता उभादांडा येथे जाहीर प्रचार सभा होईल. तर मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता रेडी येथे, सायंकाळी ६ वाजता तुळस येथे आणि रात्री ८ वाजता आडेली जिल्हा परिषद मतदार संघात ही संयुक्त जाहीर सभा होणार आहे. ही निवडणूक महायुतीतर्फे आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर लढवत आहोत. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे त्यामुळे जिल्हा परिषद मध्ये माहितीचे सरकार आल्यानंतर विकासाला आणखी चालना मिळणार आहे. ते सर्वांना माहीत असल्याने मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रचारात मिळत आहे असेही यावेळी बोलताना मनीष दळवी यांनी सांगितले.
जिल्ह्याचा विकास करण्याची ताकद ही खासदार नारायण राणे यांच्यात आहे. चुकून एखादा अपक्ष उमेदवार निवडणून आल्यास तो त्या मतदार संघात कोणत्याच पध्दतीने निधी आणून विकास करू शकत नाही. कारण जिल्ह्यात सत्ता ही महायुतीचीच असणार आहे.
या भागाचा विकास करणारे नेते हे महायुतीचेच असल्याने येणाऱ्या ७ तारीख ला महायुतीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद निवडणुकीत म्हापण मध्ये शिवसेनेच्या यज्ञा साळगावकर, आडेली मध्ये समिधा नाईक, तुळस मध्ये शिवसेनेच्या योगिता परब, उभादांडा येथे भाजपचे मनवेल फर्नांडिस व रेडी मध्ये भाजपचे प्रितेश राऊळ तसेच पंचायत समिती साठी परुळे मध्ये शिवसेनेचे सचिन देसाई, म्हापण मध्ये भाजपचे विष्णू फणसेकर, आडेली मध्ये नितीन मांजरेकर, वायंगणी मध्ये भाजपच्या शितल राऊत, तुळस मध्ये शिवसेनेच्या सुचिता वजराटकर, मातोंड मध्ये भाजपचे शंकर घारे, उभादांडा मध्ये शिवसेनेच्या साक्षी नार्वेकर, रेडी मध्ये भाजपच्या प्रियांका घाटवळ व शिरोडा मध्ये शिवसेनेच्या शितल साळगावकर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन सचिन वालावलकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!