*कोंकणा एक्सप्रेस*
*सातेरी मायगवसच्या आशीर्वादात जनसेवेचा संकल्प; सौ. साक्षी देसाईंचा प्रचार शुभारंभ*
*दोडामार्ग: शुभम गवस*
हेवाळे गावची जत्रा असलेल्या शुभदिनी नारळ ठेवून तसेच ग्रामदैवत श्री देव सातेरी मायगवस यांचे आशीर्वाद घेऊन कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सौ. साक्षी देसाई यांनी आपल्या प्रचाराची अधिकृत सुरुवात केली.
दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, तेरवण मेढे, केर, मोर्ले, कोनाळ व घोटगेवाडी या सहा ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातून सौ. साक्षी देसाई यांनी हेवाळे गावातून प्रचाराचा श्रीगणेशा केला. ग्रामदैवताच्या चरणी नतमस्तक होत प्रचाराला सुरुवात केल्याने या प्रारंभाला धार्मिक तसेच भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
सध्या त्या हेवाळे गावाच्या विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत असून, त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे व लोकहिताच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या समाजकारणात नवख्या चेहऱ्याऐवजी अनुभवी, सक्रिय व कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखल्या जात आहेत.
निवडणूक रिंगणात उतरताना, निवडून आल्यास पंचायत समिती स्तरावर पारदर्शक, ठोस व लोकाभिमुख विकासकामे राबविण्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. अपक्ष उमेदवार असतानाही तळागाळातील नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
संपूर्ण मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क झपाट्याने वाढत असून, आगामी पंचायत समिती निवडणुकीत सौ. साक्षी देसाई या एक सक्षम, प्रभावी व मजबूत दावेदार म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

