*कोंकण एक्सप्रेस*
*पालकांनी मुलांच्या अंगी असणारे कलागुण ओळखून तसेच शिक्षण द्यावे ; शिक्षक व पालक यांच्यात मैत्रीचे नाते असावे : सत्यवान भोगले*
*चाफेड शाळा नं 1 चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न*
*शिरगांव : संतोष साळसकर*
दूंडाच्या गडामुळे चाफेड गावाला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. या गावचे सुपुत्र पत्रकार संतोष साळसकर व प्रदीप घाडी यांनी वेळोवेळी या गडाची प्रसिद्धी दिल्यामुळे गावचे नाव मोठे झाले आहे. आई वडील हे आपले प्रथम गुरु त्यानंतर शिक्षक हेच मुलांवर चांगले संस्कार घडवतात. मात्र आजच्या मोबाईल युगात मुलानी मोबाईलचा वापर चांगल्यासाठी करावा. पालकांनी मुलांच्या अंगी असणारे चांगले कलागुण ओळखून त्यांना तसे शिक्षण द्यावे. तरच आपली ही भावी तरुण पिढी सक्षम होईल. शिक्षक व पालक यांच्यात मैत्रीचे नाते असावे. असे चाफेड गावचे माजी सरपंच तथा विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान भोगले यांनी बोलताना व्यक्त केले.
देवगड तालुक्यातील चाफेड प्रशाला नंबर 1 चे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्याचे उद्घाटन तंटामुक्ती समिती अध्यक्ष सत्यवान भोगले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सरपंच महेश राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव उर्फ बबन गावकर, उपाध्यक्ष उदय राणे, मुख्याध्यापक विकास वाडीकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सत्यवान भोगले, माजी सरपंच आकाश राणे, माजी मुख्याध्यापिका सौ. गौरी नारकर, माजी सरपंच संतोष साळसकर, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन साळकर, एकनाथ घाडी, वामन राणे, प्रकाश मोडकर, माजी अध्यक्ष सचिन मोंडकर, प्रदीप घाडी, भास्कर राणे, माजी उपसरपंच तुकाराम घाडी, बंडू वाडीकर, शिक्षक प्रकाश पवार, केंद्रप्रमुख सुगंध तांबे, केंद्र मुख्याध्यापक प्रकाश झाडे, चाफेड – भोगलेवाडी प्रशालेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल परब, चाफेड – भोगलेवाडी प्रशालेचे मुख्याध्यापक दयानंद पांडे, शिक्षक संजय गोठणकर, केंद्रप्रमुख सुदाम जोशी, आशा स्वयंसेविका सौ. प्रणिता राणे, अंगणवाडी सेविका सौ. दिक्षिता घाडीगावकर, वर्षा राणे, लक्ष्मण नारकर, यशवंत धामापूरकर आदींसह ग्रामस्थ पालक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सरपंच महेश राणे म्हणाले की, या प्रशालेपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झाल्यामुळे या प्रशालेचा आता खऱ्या अर्थाने भौतिक विकास होणार आहे. यासाठी मंत्री नितेश राणे यांनी आपला फंड दिल्यामुळे हे काम होऊ शकले. तसेच संबंधित जमीन मालकांनीही आपली जमीन विना मोबदला दिल्यामुळे हे शक्य झाले त्या सर्वांचे त्यानी विशेष आभार मानले. तसेच येत्या काही दिवसात या प्रशालेत आजी-माजी विद्यार्थ्यांचा भव्य दिव्य असा मेळावाही आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
यावेळी संबंधित जमीन मालकांचा शाल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच 10 वी 12 वी तील यज्ञेश घाडी आणि मृगा राणे या विध्यार्थ्यांचा गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लवू राणे यांनी तसेच माजी मुख्याध्यापिका सौ. गौरी नारकर यांनी रोख रक्कम पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या प्रशालेचा विद्यार्थी कु. गौरांग राणे यांने लांब उडी स्पर्धेत जिल्हास्तरावर यश मिळवल्याबद्दल त्याचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुलांचे विविध गुणदर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कुडाळ येथील नवतरुण दशावतारी नाट्य मंडळाचा ‘भैरव मायाजाल’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विकास वाडिकर व प्रदीप घाडी यांनी केले.

