*कोंकण एक्सप्रेस*
*महिला नेतृत्वाची प्रभावी लढाई – अपक्ष म्हणून मैदानात सौं साक्षी देसाई..!*
*दोडामार्ग: शुभम गवस*
दोडामार्ग पंचायत समितीच्या कोनाळ मतदारसंघातून सौ. साक्षी संदिप देसाई यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात प्रवेश केला असून, त्यांच्या उमेदवारीकडे सर्व स्तरांतून लक्ष वेधले जात आहे. सध्या त्या ग्रामपंचायत आयनोडे–हेवाळेच्या सरपंच म्हणून कार्यरत असून, त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासात्मक व सामाजिक कामांमुळे त्या मतदारांमध्ये परिचित चेहरा ठरल्या आहेत.
सरपंचपदाची जबाबदारी सांभाळताना सौ. साक्षी देसाई यांनी लोकसहभागातून विकास हा मंत्र स्वीकारत ग्रामपंचायतीच्या कामकाजाला नवी दिशा दिली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, ग्रामस्वच्छता अभियान, तसेच मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी पारदर्शक व समन्वयात्मक प्रशासन राबवले.
महिला सक्षमीकरण, बचतगटांचे बळकटीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी, तसेच सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. सामाजिक कार्यातून मिळालेला अनुभव आणि प्रशासकीय कामकाजाची जाण यामुळे त्या पंचायत समिती पातळीवरही प्रभावी काम करू शकतील, असा विश्वास समर्थक व्यक्त करत आहेत.
आपल्या उमेदवारीबाबत बोलताना सौ. साक्षी देसाई यांनी विकास, विश्वास आणि लोकहित या त्रिसूत्रीवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “पंचायत समिती ही ग्रामीण विकासाची महत्त्वाची कडी असून, या माध्यमातून गावागावातील प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे त्या सांगतात.
सर्वसामान्य जनतेशी असलेली थेट नाळ, प्रशासनातील अनुभव, समाजाभिमुख दृष्टिकोन आणि राजकीय वारसा यामुळे सौ. साक्षी देसाई यांची उमेदवारी कोनाळ मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत असून, आगामी निवडणुकीत मतदार काय कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

