अनुभव आणि सामाजिक कार्याच्या आधारावर श्रीमती स्नेहा संजय गवस यांची उमेदवारी लक्षवेधी…

अनुभव आणि सामाजिक कार्याच्या आधारावर श्रीमती स्नेहा संजय गवस यांची उमेदवारी लक्षवेधी…

*कोंकण एक्सप्रेस*

*अनुभव आणि सामाजिक कार्याच्या आधारावर श्रीमती स्नेहा संजय गवस यांची उमेदवारी लक्षवेधी…*

*दोडामार्ग.. शुभम*

झरेबांबर पंचायत समिती मतदारसंघात भाजप–शिवसेना महायुतीच्या वतीने शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती स्नेहा संजय गवस यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवत जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक प्रश्नांची जाण, सामाजिक कामाचा अनुभव आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांची उमेदवारी मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे.
सार्वजनिक जीवनात सेवा हीच भूमिका मानून त्यांनी आजवर विविध पातळ्यांवर कार्य केले आहे. सरपंचपदाच्या काळात गावाच्या गरजा ओळखून त्यांनी मूलभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि महिला सक्षमीकरण यावर विशेष भर दिला. कागदी योजना न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर त्यांचा भर राहिल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जाते.
गावातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने झरेबांबर येथे काजू प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना नियमित उत्पन्नाचा आधार मिळाल्याचे चित्र आहे. शेतीपूरक उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा हा प्रयत्न म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. महिलांसाठी कार्यक्रमांचे आयोजन, बचतगट चळवळीला बळकटी आणि स्वावलंबनाच्या दिशेने प्रयत्न करण्यात आले. झरेबांबर येथे महिला दिनाचे आयोजन सुरू करण्यामागेही सामाजिक जागृतीचा उद्देश असल्याचे सांगण्यात येते.
पायाभूत सुविधांच्या बाबतीतही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. झरेबांबर–पिकुळे मार्गावरील नदीवर पूल उभारण्यात आल्याने परिसरातील दळणवळण अधिक सुलभ झाले आहे. या कामामुळे दैनंदिन प्रवास, शेतीमाल वाहतूक आणि आपत्कालीन सेवांना मदत झाली असल्याचे नागरिकांचे मत आहे. या प्रकल्पासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून समन्वय साधण्यात आला होता.
पंचायत समितीच्या माध्यमातून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काय करता येईल, याबाबतचा अनुभव आणि दृष्टीकोन घेऊन श्रीमती स्नेहा संजय गवस निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या आजवरच्या कामकाजामुळे आणि स्थानिक प्रश्नांवरील जाणिवेमुळे त्यांची उमेदवारी मतदारसंघात लक्षवेधी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!