*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर कणकवलीच्या रसिका कदम नियत वयोमानानुसार निवृत्त*
*कणकवली ः संजना हळदिवे*
विद्यामंदिर शाळा हेच माझे कुटुंब आहे व यातील प्रत्येक कर्मचारी हा माझा कुटुंबातील सदस्य आहे. अशा भावनिक शब्दात विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या रसिका कदम यांनी आपले मनोगत मांडले. त्या नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्या. यावेळी संपूर्ण शिक्षकाच्या कारकिर्दीत शिक्षणापासून वंचित असलेल्या अनेक मुलांना मी शिक्षणाच्या मार्गात आणले. त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी खारीचा वाटा उचलला. त्याचे आज समाधान वाटते असेही त्या पुढे म्हणाल्या.
त्यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभा प्रसंगी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वनवे, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सावडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.टी. सावंत, संस्कृतिक विभाग प्रमुख जनार्दन शेळके, माजी शिक्षक जे.डी. कांबळी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्वेता करंबेळकर, संगीता साटम, विद्या शिरसाट इत्यादी उपस्थित होते. यावेळी त्यांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
श्रीमती रसिका कदम यांनी या प्रसंगाचे औचित्य साधून शाळेला पुस्तके व खेळाचे साहित्य भेट म्हणून दिले.
यावेळी मुख्याध्यापक डॉ. पी.जे. कांबळे यांनी सांगितले की ज्या काळात मुलींना शिक्षण दिले जात नव्हते, मुलींचे शिक्षण खूप खडतर असायचे, त्या काळात कदम मॅडम यांनी शिक्षकी पेशा निवडला व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणले. त्यासाठी त्यांनी अनेक त्याग केले. शिक्षक हा आईसारखा असतो. कदम मॅडम ने आईच्या प्रेमानेच सर्व विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले व चांगले संस्कार लावले.
प्रशालेचे पर्यवेक्षक अच्युतराव वनवे यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देताना सांगितले की कदम मॅडमनी विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवले, चांगले संस्कार दिले. शिक्षकांना त्यांची नेहमीच उणीव भासेल. यावेळी आर.टी. सावंत, वामन तर्फे, प्रसाद राणे, संतोष तांबे, प्रबोधन कदम, प्रतिमा, श्वेता करंबेळकर, बुधा दरवडा, अमोल शेळके, संगीता साटम, जे.डी. कांबळी यांनी आपले मनोगत मांडले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतीक विभाग प्रमुख जनार्दन शेळके यांनी केले. आभार प्रदर्शन एन. एन. सावंत यांनी मानले.

