जिल्हा बँकेत कर्जप्रक्रियेत दबंगशाही करत बँकेची लुट – राजन तेली

जिल्हा बँकेत कर्जप्रक्रियेत दबंगशाही करत बँकेची लुट – राजन तेली

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हा बँकेत कर्जप्रक्रियेत दबंगशाही करत बँकेची लुट – राजन तेली*

*बँकेतील संशयास्पद व्यवहाराच्या कारवाईसाठी उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट; जिल्ह्याचा सहकार धोक्यात येण्याची भीती*

*कणकवली ः संजना हळदिवे*

जिल्हा बँकेत गेल्या चार वर्षांचे कर्ज व्यवहार तपासण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे केली आहेत. बँकेत अध्यक्ष मनीष दळवी व मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी दबंग शाही करत बेहिशोबी कर्ज वाटप केले आहे. ही बँकेची लुट थांबवण्यासाठी मी प्रसंगी उच्चन्यायालयात दाद मागणार आहे. कारण जिल्ह्यातील सहकार धोक्यात येण्याची भिती आहे. सहकार खात्याने चार वर्षाच्या सर्व कर्ज व्यवहारांची चौकशी करून गडबडी रोखावी. जिल्हा बँकेत कर्जप्रक्रियेत दबंगशाही करत बँकेची लुट होत असल्याचा आरोप माजी आ. राजन तेली यांनी केला.

कणकवली येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेत कर्ज देण्याच्या प्रक्रियेत गडबड सुरू आहे. बँकेतील कर्ज वितरण चुकीच्या मार्गाने होऊन सहकारी संस्थेची प्रतिष्ठा धोक्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्जवाटप व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून त्यासाठी तातडीने अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी त्यांनी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे. नाहीतर यशवंत सहकारी बँकेप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. पोलिसांमार्फत चौकशी होऊन दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचे माजी आ. राजन तेली यांनी सांगितले.

त्यांनी श्रीपाद महाजन यांना दिलेले कर्ज पाहता भोगवे येथील 3.39 हेक्टर क्षेत्र शासकीय दरानुसार किंमत 88 लाखांचे आहे. या व्यक्तीला वेगवेगळ्या माध्यमातून एकूण ५९ कोटी रूपये कर्ज दिले आहे. पहिले कर्ज तारणगहाण खत देण्यापूर्वी देण्यात आले आहे. त्यामुळे तारणाचे खरेदीखत अत्यंत संशयास्पद आहे. वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे येथील एका गोठ्याची किंमत ३१ कोटी रुपये दाखवली आहे, हा जगातील सर्वात महागडा गोठा म्हणून ओळखला जाऊ शकतो. याच गोठ्यास तारण ठेवण्यात आले असून या प्रकरणात शेतमांगरांसाठी वाटप करण्यात कर्ज किंमतीपेक्षा जास्त कित्येकपटीने केल्याचा आरोप राजन तेली यांनी केला आहे.

उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

जिल्हा बँक टिकली पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, पण अशा प्रकारे कर्ज देणे सहकारी संस्थेच्या मुळ तत्वाला हानी पोहोचवणार आहे. जिल्ह्यातील २३४ पतसंस्था आणि जवळपास हजारो सभासद यांचे मोठे नुकसान होऊ शकते. आमच्याकडे या आरोपांचे पुरावे आहेत आणि आम्ही याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत, पण सहकार खाते आणि नाबार्ड यांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. बँकेला यापूर्वी दोन लाखांचा दंडही झाला होता. जर यामध्ये त्वरित योग्य ती कारवाई झाली नाही, तर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी आ. राजन तेली यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!