दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलाक्षेत्रातील करिअर संधींवर मार्गदर्शन

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलाक्षेत्रातील करिअर संधींवर मार्गदर्शन

*कोंकण एक्सप्रेस*

*दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलाक्षेत्रातील करिअर संधींवर मार्गदर्शन*

*कणकवली ः संजना हळदिवे*

क्रेडार संचलित देवरुख कला महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कलाक्षेत्रातील करिअर व संधी’ या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गामुळे कला शाखेतील उज्ज्वल भवितव्याच्या अनेक वाटा विद्यार्थ्यांसाठी खुल्या झाल्या.
मान्यवरांचे स्वागत आणि मार्गदर्शन
या कार्यक्रमास देवरुख कला महाविद्यालयाचे प्राचार्य रंजीत मराठे सर आणि प्राध्यापक विक्रांत परांजपे सर उपस्थित होते. सुरुवातीला कलाशिक्षक श्री. प्रसाद राणे सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि या मार्गदर्शन वर्गाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.
कलाक्षेत्रातील आर्थिक संधींवर जोर
यावेळी प्राचार्य रंजीत मराठे सर यांनी विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीनंतर कलाक्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींची आणि कोर्सेसची सविस्तर माहिती दिली. त्यांनी हे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर मिळणारे फायदे, सध्याचे व माजी विद्यार्थी कसे प्रगती करत आहेत, तसेच या अभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांना होणारा आर्थिक फायदा कसा होऊ शकतो, यावर विशेष मार्गदर्शन केले. कला केवळ छंद नसून ते एक आकर्षक व्यावसायिक क्षेत्र कसे बनले आहे, हे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले.
प्रात्यक्षिकातून व्यक्तिचित्रण
यानंतर प्राध्यापक विक्रांत परांजपे सर यांनी विद्यार्थ्यांमधीलच एका विद्यार्थिनीला मॉडेल म्हणून निवडून प्रत्यक्ष व्यक्तिचित्रण (पोर्ट्रेट) प्रात्यक्षिक करून दाखवले. या प्रात्यक्षिकाने विद्यार्थ्यांना कलेच्या तांत्रिक बाजूची माहिती मिळाली. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलाक्षेत्रासंबंधित सर्व शंकांचे निरसन केले.
हा मार्गदर्शन वर्ग यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे सर आणि पर्यवेक्षक श्री. ए. व्ही. वनवे सर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मिळून जवळपास शंभर जण उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी कलाशाखेतील करिअरच्या दृष्टीने नवीन दिशा देणारा हा मार्गदर्शन वर्ग अत्यंत यशस्वी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!