*कोंकण एक्सप्रेस*
*भाजपाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी जोडलेले जात प्रमाणपत्र खोटे*
*असा घणाघाती आरोप मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केला*
*मालवण :प्रतिनिधी*
मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोडलेले जात प्रमाणपत्र हे खोटे आहे असा घणाघाती आरोप मालवणचे आमदार निलेश राणे यांनी करून यासंदर्भात आपण न्यायालयात धाव घेऊन दाद मागणार आहोतच, मात्र उद्या पत्रकार परिषदेत पुराव्यासहित याबाबत भांडाफोड करू, असा इशाराही त्यांनी आज दिला.
मालवण येथे आज सायंकाळी शिवसेनेची सभा राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे हे बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, मालवण नगरपालिका निवडणुकीत भाजप पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी ज्या उमेदवार दिल्या आहेत, त्या ७ नोव्हेंबर २०२५ रोजी पर्यंत मराठा होत्या. मात्र त्याच दिवशी या उमेदवार इतर मागासवर्गीय झाल्या. यापूर्वी या उमेदवार मराठा समाजाच्या अनेक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. भाजपने या उमेदवार ‘एक मराठा… लाख मराठा’ या आंदोलनातही सहभागी झाल्या होत्या. मात्र अचानक ओबीसीचे सर्टिफिकेट भाजप उमेदवार सौ. शिल्पा खोत यांच्याकडे कसे आले? असा सवाल करीत आम. निलेश राणे म्हणाले, कालेलीचे हे परब बारापाचाचे मानकरी ! म्हणजे कडक मराठा! ते वरवडे गावात कसे गेले म्हणजे आमच्या वरवड्यात ते कसे आले? हे शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि प्रशासनाकडे गेलो तर एक दिवस लिपिक नाही… दुसऱ्या दिवशी गेलो आरओ नाही… तिसऱ्या दिवशी कागद तपासणारा लिपिक नाही…चौथ्या दिवशी मोडी लिपीवाला नाही, पाचव्या दिवशी मोडी लिपीचा अनुवादक नाही, सहाव्या सातव्या दिवशी शनिवार रविवार आला. असा एक आठवडा गेला, मात्र परब हे काही आम्हाला सापडले नाहीत. भाजपा उमेदवारांनी वंशावळ दाखवताना जो उल्लेख केला आहे तो मनोहर विठ्ठल परब यांचा संदर्भ देऊन केला आहे. मात्र मोडी लिपी चे कागद तपासताना मनोहर विठू परब हे नाव सापडले. मात्र तो माणूसच सापडला नाही असा आरोप करून आमदार निलेश राणे यांनी खोटारडेपणा म्हणजे किती खोटारडेपणा करायचा? खोटेपणाचा अंत हा वाईट होतो असे सांगितले. नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या परब यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा पुनरुच्चार निलेश राणे यांनी केला.
आपल्या भाषणात आमदार निलेश राणे पुढे म्हणाले, निलेश राणे यांना दाबायचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय, परंतु मी दबणार नाही. आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची काही माणसे आमच्याकडे आली होती. त्यांना दर दिवशी माझा मिनिट तू मिनिट दौरा हवा आहे. आज जी सत्ता तुमच्याकडे आहे तशी आमच्याकडेही आहे. मात्र, आपण सत्तेचा दुरुपयोग करणार नाही. माझा मिनिट टू मिनिट दौरा घेऊन तुम्ही काय करणार आहात असा सवाल करीत ते म्हणाले, मला जिथे पोहोचायचे आहे तिथे मी पोहोचणारच ! निलेश राणे याला थांबवायची कुणाची टाप नाही. पोलिसांना आम्ही मानतो, मात्र नको ते धंदे कराल तर कायदा आम्हालाही कळतो, आम्ही अजिबात सहन करणार नाही, असा इशारा आमदार राणे यांनी दिला.
निवडणुकीच्या अगोदर दोन दिवस जाहीर सभेत आणखी काही गोष्टी मी नागरिकांसमोर मांडणार आहोत. कारण युती आम्हाला हवी होती, कारण हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आम्हीही आहोत. मात्र आज जो वणवा लागला आहे, तो कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून ही माझी भूमिका आहे. मालवण नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच आणि मालवण शहर दर्जेदार शहर बनविल्याशिवाय आपण राहणार नाही, असेही आमदार राणे म्हणाले.

