*कोंकण एक्सप्रेस*
*मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण यांना ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस उमेदवार यांच्या प्रचाराचा श्रीफळ अर्पण*
*मालवण : प्रतिनिधी*
काही शिंदे गटातील लोक धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेत आहेत परंतु आनंद दिघे यांनी सांगितले होते, की गद्दारांना माफी नाही. त्यामुळे मालवणची जनता या गद्दारांना माफ करणार नाही. ज्यांनी पैशांसाठी पक्ष सोडला, अशांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय मालवणची जनता शांत बसणार नाही, असे रोखठोक प्रतिपादन ठाकरे शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी येथे बोलताना केले
मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण यांना ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस उमेदवार यांच्या प्रचाराचा श्रीफळ अर्पण केल्यानंतर नारायण मंदिर येथे माजी आमदार वैभव नाईक आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या उपस्थितीत हरी खोबरेकर हे बोलत होते यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर, शहरप्रमुख बाबी जोगी, आपा चव्हाण, रवी तळाशिलकर, अन्वय प्रभू, मंदार गावडे, मनोज मोंडकर, दीपा शिंदे, देवानंद लुडबे, अरविंद मोंडकर, तृप्ती मयेकर, गौरव वेर्लेकर, जेम्स फर्नांडिस, राजा शंकरदास, अमोल सावंत, महेश शिरपुटे, सिद्धेश मांजरेकर, रुपा कुडाळकर, प्रमोद करलकर, सर्वेश लुडबे, शुभम लुडबे, अमृता मोंडकर, अनिता गिरकर, गौरी मयेकर, माधुरी प्रभू महेंद्र म्हाडगूत, महेश जावकर, मंदार ओरसकर, नीलेश दूधवडकर, पूजा जोगी, राधिका मोंडकर, रुपाली सकपाळ, संदेश कोयंडे, स्मिता सरमळकर, सुमित जाधव, तपस्वी मयेकर, तेजस नेवगी, उमेश चव्हाण, उमेश मांजरेकर, वृंदा गवंडी, योगिता गावकर व इतर पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना हरी खोबरेकर म्हणाले, माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली उद्धव बाळासाहेब पक्षाच्यावतीने नवीन चेहऱ्यांना संधी देऊन आज ही मालवण नगरपालिकेची निवडणूक लढवत आहोत. या निवडणुकीला सामोरे जात असताना निष्कलंक निःस्वार्थी वृत्तीने काम करणारेउमेदवार आम्ही उतरवले आहेत. पूजा करलकर या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यांना नगरपालिकेचा सखोल अभ्यास असल्याने त्या पदाच्या प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी १९ वर्षे नगरसेविका पद भूषविले आहे. या. निवडणुकीमध्ये त्यांना संपूर्ण मालवण शहराचा विकास करण्याचे भाग्य मालवणवासीयांच्या आशीर्वादाने लाभो. आमचे वीस उमेदवार मशाल आणि हात या निशाणीवर लढत आहेत. या निवडणुकीत आम्ही जिंकण्यासाठीच उतरलेलो आहोत असे सांगून ते म्हणाले मालवण दांडी येथील ऐतिहासीक अशा मोरयाचा धोंडा येथे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलेल्या विकासकामांचे भूमिपूजन आणि मंत्री आशिष शेलार यांनी मामा वरेरकर नाट्यगृहासाठी पाच कोटी रुपयांचा निधी आणल्याच्या केलेल्या वल्गना आजही मालवणवासीयांच्या लक्षात आहेत. यामुळे मालवणच्या मतदारांना फसविण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी आता पुरे करावे. येथील मतदारांनी आपला फिक्स नगराध्यक्ष आणि नगरसेवक निश्चित केलेले आहेत. यामुळे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पूजा प्रमोद करलकर या बहुमतांनी विजयी होणार असा विश्वास हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी खोबरेकर यांनी खासदार नारायण राणे यांच्यावरही टीका केली ते म्हणाले, आज ‘खासदार नारायण राणे यांना भाजप आणि शिंदे सेनेबद्दल काही घेणे-देणे नाही. त्यांना फक्त आपल्या दोन्ही मुलांची सत्ता आली पाहिजे. म्हणजेच मांझे दोन्ही मुलगे नोकरीला लागले पाहिजेत, अशीच इच्छा खासदारांची आहे. यावरूनच आपल्याला राणे कुटुंबियांची घराणेशाही दिसत आहे. नगरपालिका त्यांना कशासाठी पाहिजे, तर त्यांचे जे कार्यकर्ते ठेकेदार आहेत, त्यांना ते ठेके मिळाले पाहिजेत यासाठी त्यांना नगरपालिका हवी आहे असा आरोप करून प्रत्यक्ष जनतेच्या सेवेत काम करणाऱ्या ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या, असे आवाहन खोबरेकर यांनी केले.

