उबाठा शिवसेनेच्यावतीने नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांची निवड

उबाठा शिवसेनेच्यावतीने नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांची निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*उबाठा शिवसेनेच्यावतीने नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांची निवड* 

*वेंगुर्ला : प्रथमेश गुरव*

वेंगुर्ल्यात आघाडीबाबत कोणतीही प्रगती अद्याप झालेली नाही. मात्र, आम्ही आशावादी आहोत. निवडणुकीची अर्ज भरण्याची शेवटी तारीख अत्यंत जवळ आली असल्याने आम्ही नगराध्यक्षासहीत इतर उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आघाडीबाबत चर्चा सुरू राहील. दरम्यान उबाठा शिवसेनेच्यावतीने नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांची निवड करण्यात आली आहे. आमच्याकडे एक नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवकपदाचे उमेदवार तयार असल्याची माहिती माजी खासदार तथा उबाठा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी वेंगुर्ले येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
   वेंगुर्ले सुंदर भाटले येथील उबाठा शिवसेनेच्या कार्यालयात माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेत्या जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रेया परब, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख शैलेश परुळेकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी नगरसेवक तुषार सापळे, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, माजी शहरप्रमुख अजित राऊळ यांच्यासहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
  यावेळी बोलताना माजी खासदार राऊत म्हणाले की, वेंगुर्ला येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या सर्वच पदाधिका-यांनी ही वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुक आघाडीच्या मार्फत लढविली जावी, अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत. आज मी आमच्या पक्षाकडून या निवडणूकी संदर्भात केलेली तयारी जाणून घेतली. आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढविल्या जाव्यात अशी आमची आजही इच्छा आहे आणि उद्याही रहाणार आहे. सावंतवाडीमध्ये आघाडी बाबत ब-यापैकी प्रगती झाली आहे. मात्र दुर्देवाने वेंगुर्ल्यात आघाडीबाबत कोणतीही प्रगती झालेली नाही. आम्ही आशावादी आहोत. निवडणुकीची अर्ज भरण्याची शेवटी तारीख अत्यंत जवळ आली असल्याने आम्ही नगराध्यक्षासहीत इतर उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आघाडीबाबत चर्चा सुरू राहिल.
   आज उबाठा शिवसेनेच्यावतीने नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत तालुका प्रमुख यशवंत परब आणि शहरप्रमुख शैलेश परूळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक तुषार सापळे, अजित राऊळ, निलेश चमणकर ही निवडणुक यंत्रणा सांभाळणार आहेत. आज आमच्याकडे एक नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवकपदाचे उमेदवार तयार आहेत. त्यांचे अर्ज भरण्याचे काम सुरू आहेत. उर्वरित तीन जागांवर आघाडीतील इतर पक्षांसोबत चर्चा होईल किवा आम्ही ते उमेदवार जाहीर करू. आघाडी झाली तर आनंदच आहे. न झाल्यास पक्षाला स्वबळावर निवडणुक लढवावी लागेल. असेही ते म्हणाले.
   वेंगुर्लेतमागच्या पाच वर्षात भ्रष्टाचारी नगराध्यक्षांच्या माध्यमातून वेंगुर्ल्याचे मार्केट, मच्छिमार्केट, वॉटर एटीएम आदी विविध कामांमध्ये भ्रष्टचार झालेला. हा आम्ही उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर भाजपाच्या गुंडांनी वेंगुर्ल्यासारख्या भागात जो गुंडगिरीचा हैदोस घातलेला होता. त्याचा अनेकांना फटका बसलेला आहे. भाजपामध्ये जाऊन नारायण राणेंची गुंडगिरी ही आता फोफावलेली आहे. त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही लढू आणि वेंगुर्ल्याचे दैदिप्यमान नाव आहे ते नाव पुन्हा उदयास आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. वेंगुर्ल्यातील वैभव पुन्हा एकदा टिकवून ठेवायचे असेल तर ‘आम्ही वेंगुर्लेकर, आमचे वेंगुर्ले, आम्ही वेंगुर्ल्यासाठी‘ हे घोषवाक्य घेऊन आम्ही वेंगुर्ल्यामध्ये काम करणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!