*कोंकण एक्सप्रेस*
*_वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात संपन्न_*
*• शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सामूहिक गायन*
*सिधुदुर्गनगरी ७:*
थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी रचित ‘वंदे मातरम’ या गीत रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वंदे मातरमचे सामूहिक गायन करण्यात आले.
सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा क्रिडा संकुलामध्ये जिल्हा प्रशासन आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम गीताचे आयेाजन करण्यात आले होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानी पद्मश्री परशुराम गंगावणे, तर प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची होती. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अधिष्ठाता डॉ. अनंत डवगे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, श्री श्री गावडे महाराज, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसिलदार वीरसिंह वसावे तसेच आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ‘वंदे मातरम’ या राष्ट्रभावना जागवणाऱ्या गीताचे एकसुरात सामूहिक गायन करण्यात आले.आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम’ विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले.
बऱ्याचदा आपण वंदे मातरम् या गीताच्या सुरुवातीचे शब्द ओळखतो, पण पूर्ण गीताचा अर्थ, इतिहास आणि भावना आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. उद्देशही हाच आहे की आजच्या तरुणांना स्वातंत्र्य लढ्याचा आणि आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचा इतिहास समजला पाहिजे बंकीमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘आनंदमठ’ कादंबरीतील या गीताचा ऐतिहासिक संदर्भ पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितला.
“हा कार्यक्रम म्हणजे केवळ स्मरण नव्हे तर देशभक्तीच्या भावनेचा पुनर्जन्म आहे. मुलांमध्ये देशप्रेम आणि एकात्मतेची भावना जागृत करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण समाजाला परत काय देणे लागतो, याची जाणीव या निमित्ताने व्हावी, हाच या उपक्रमाचा हेतू असल्याचे प्रमुख वक्ते डॉ. सचिन सनगरे यांनी सांगितले.

