*कोंकण एक्सप्रेस*
*व्हेल माशांच्या सांगाड्यांचे पर्यटनदृष्ट्या संवर्धन करावे*
*पर्यटन व्यावसायिक महासंघाची पालकमंत्र्यांकडे मागणी*
*मालवण (प्रतिनिधी)*
मालवण आणि वायंगणी समुद्र किनारी मिळालेल्या व्हेल माशाचे सांगाडे पर्यटनदृष्ट्या जतन, संवर्धन करावे, अशी मागणी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
समुद्रातील वादळी वातावरणामुळे दोन व्हेल मासे मृतावस्थेत मालवण व वायंगणी समुद्रकिनारी वाहत आले असून या माशांचे सांगाडे जतन, संवर्धन करून पर्यटन व पर्यावरणदृष्ट्या या जिल्हयात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी उपलब्ध केल्यास पर्यटनासाठी तसेच समुद्री, जैविक अभ्यासकांसाठी माध्यम निर्माण होईल. भाजप प्रदेशाध्यक्ष व माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून तारकर्ली समुद्र किनारी राज्य सरकारच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून ३ कोटी मंजूर झाले आहेत, त्यासाठी ६० गुंठे सरकारी पड जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित करून जमीन संपादन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असून जागा मान्यता अंतिम टप्यात आहे. याठिकाणी समुद्र किनारी म्युझियम उभारता येईल, असेही विष्णू मोंडकर यांनी म्हटले आहे.
या माशांचा सांगाडा सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील खडकामध्ये स्थिरावला असून दुसरा वायंगणी समुद्र किनारी जेसीबीच्या साहाय्याने पुरला आहे. हे सांगाडे शासनाने ताब्यात घेऊन आवश्यक ती केमिकल प्रक्रिया करून माशांच्या सांगाड्याचे म्युझियम करावे. त्या माध्यमातून नवीन माहिती केंद्र मालवणला तयार होईल. जिल्ह्यात दहा लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. या माध्यमातून जिल्हयाच्या पर्यटन वाढीसाठी अजून एक पर्यटनस्थळ वाढेल. यासाठी मत्स्यव्यवसाय खाते व कांदळवन खात्याच्या संयुक्त विद्यमाने जतन-संवर्धन करण्याचा आदेश देण्यासाठी नीतेश राणेंना निवेदनाद्वारे विनंती केल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली.

