नांदगावची सुकन्या सेरेना म्हसकर हिने देशाला मिळवून दिले सुवर्णपदक

नांदगावची सुकन्या सेरेना म्हसकर हिने देशाला मिळवून दिले सुवर्णपदक

*कोंकण एक्सप्रेस*

*नांदगावची सुकन्या सेरेना म्हसकर हिने देशाला मिळवून दिले सुवर्णपदक*

*कबड्डी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे केले प्रतिनिधित्व*

*महाराष्ट्रातून एकमेव सेरेना होती भारतीय संघात*

*मुंबई विमानतळावर झाले जंगी स्वागत*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

कणकवली तालुक्यातील नांदगाव मधलीवाडी येथील सुकन्या सेरेना सचिन म्हसकर हिने नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या एशियन युथ गेम्स कबड्डी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेनंतर तिचे मुंबई विमानतळावर आगमन होताच भारतामध्ये जंगी स्वागत करण्यात आले. भारत माता की जय … वंदे मातरम् अशा घोषणाही देण्यात आल्या. सेरेनावर नांदगाव मधूनही अभिनंदन करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कणकवली तालुक्यातील नांदगाव मधलीवाडी येथील सुकन्या सेरेना सचिन म्हसकर सध्या भांडुप मुंबई येथे वास्तव्यास आहे. सेरेना दहावी इयत्तेमध्ये शिकत असतानाच आई वडिलांचा खेळाचा वारसा पुढे जपत कबड्डी खेळात आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाकडून खेळताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतीय मुलींच्या कबड्डी संघाने बेहरिंन येथे झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत इराणला हरवून पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

सेरेनाची आई वडील आंतरराष्ट्रीय खेळाडू :

सेरेनाची आई मेघाली कोरगावकर म्हसकर ही कबड्डी तर बाबा सचिन म्हसकर हे कबड्डी आणि रग्बी खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. मेघाली कोरगावकर म्हसकर यांना शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला असून सचिन म्हसकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर रग्बी खेळाचे देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

सुवर्णपदक विजेत्या सेरेनाचे मुंबई विमानतळावर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष गजानन कीर्तीकर यांनी तिचे स्वागत केले. यावेळी सेरेनाचे आई बाबा आणि असंख्य चाहते उपस्थित होते. तर महाराष्ट्र कन्या सेरेनाच्या या दमदार कामगिरी बद्दल माजी खासदार मनोज कोटक यांनी सेरेनाची भेट घेऊन अभिनंदन केले. तसेच, यावेळी मनोज कोटक यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत सेरेना च्या यशाची माहिती देताच, फडणवीस यांनीही तिचे अभिनंदन केले.

महाराष्ट्रातून एकमेव खेळाडू :
या स्पर्धेकरिता महाराष्ट्रातून एकमेव सेरेना हिची निवड झाली होती. महाराष्ट्राच्या मातीतील या खेळातील कौशल्याने सेरेना हिने विजयश्री खेचत आणून सुवर्णपदकाची कमाई केली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर सेरेनाचे अभिनंदन केले जात आहे.

महाराष्ट्र किशोरी गटाची धुरा सेरेनाने समर्थपणे सांभाळली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!