*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट महाविद्यालयाचे मुंबई विद्यापीठ अंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत यश*
मुंबई विद्यापीठाच्या अंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा नुकत्याच एस. बी. कॉलेज, शहापूर, जिल्हा ठाणे येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय , फोंडाघाटच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत फोंडाघाट महाविद्यालयातील एफ.वाय.बी.ए. विद्यार्थी आदित्य अनिल गिरीगोसावी याने ७४ किलो वजन गटात तर एफ.वाय.बी.कॉम. विद्यार्थी प्रदीपकुमार अनिल रासम याने ७९ किलो वजन गटात उत्तम झुंजार खेळ सादर करत कास्यपदक पटकविले. या दोन्ही खेळाडूंनी मुंबई विद्यापीठात महाविद्यालयाचे नाव गौरवाने उंचावले आहे.
विजेत्या खेळाडूंना क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे तसेच कुस्ती प्रशिक्षक अविनाश रेपे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुंबई विद्यापीठाच्या मानव्य विद्या शाखेचे डीन प्राचार्य डॉ. अनिल सिंग, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश सावंत, सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार विठोबा तायशेटे तसेच संचालक मंडळ व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी दोन्ही विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व फोंडाघाट ग्रामस्थांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

