*कोंकण एक्सप्रेस*
*अवास्तव गटराच्या खोदाईने दुर्घटनेला निमंत्रण*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
-कॅम्प कॉर्नर ते आनंदवाडी समोरील गटाराची खोदाई करण्यात आलेली असून गटार मोठे करण्यासाठी मोठा चर खोदण्यात आलेला आहे. खोदलेला चर हा खोल व रूंद असल्याने तो धोकादायक अवस्थेत आहे. त्यामुळे त्या गटारांचे काम करणे तात्काळ करणे आवश्यक आहे. अन्यथा या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. दुर्घटना होऊन मनुष्यहानी झाल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी उपस्थित केला आहे.
संबंधित गटार मोठे करण्याच्या उद्देशाने लांब व रूंद खोदण्यात आले आहे. यात रस्त्याचा अर्धा भाग गेला आहे. परिणामी, या मार्गावरून एकाचवेळी दोन गाड्या जाण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच भूमिगत विजवाहिनी तसेच भूमिगत गॅसपाईप लाईन घालण्यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आले होते. परंतु, अद्यापपर्यंत रस्ते पूर्ववत केलेले नाहीत. नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करावेत. अन्यथ खड्डयांमुळे मनुष्याला इजा झाल्यास या घटनेला नगरपरिषद व अधिकारी जबाबदार राहणार असल्याचा इशाराही अॅड.सातार्डेकर यांनी दिला आहे.

