राज्यात रेशन कार्ड तपासणी मोहीम सुरु

राज्यात रेशन कार्ड तपासणी मोहीम सुरु

*कोंकण एक्सप्रेस*

*राज्यात रेशन कार्ड तपासणी मोहीम सुरु*

*अपात्र लाभार्थ्यांची नोंदणी होणार रद्द*

*सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) :-*

राज्यात अपात्र रेशन कार्ड शोधण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत योग्य ते पुरावे सादर न करणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्याचे निर्देश अन्न नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. दिनांक ३१ मे पर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. या काळात रेशन कार्डधारकांच्या घरी भेट दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आरती देसाई यांनी दिली आहे*.
या विशेष मोहीमेत राज्यातील प्रत्येक रेशन कार्डची तपासणी होणार आहे. रेशन कार्डधारकांना त्यांच्या रेशन धान्य दुकानदारांकडून तपासणी नमुना फॉर्म विनामूल्य उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या फॉर्मसह कार्डधारकांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. हमीपत्रासह फॉर्म दुकानदारांकडे सादर केल्यानंतर लाभार्थ्यांना त्याची पोच मिळणार आहे.
तालुका निहाय शिधापत्रिका पुढील प्रमाणे : कुडाळ -45,591, कणकवली-40,186, सावंतवाडी- 39,170, मालवण 32,254, देवगड-32,146, वेंगुर्ला-23,364, वैभववाडी- 13,485 व दोडामार्ग-12,732 अशी आहे.
पुरवठा विभागाकडून होणाऱ्या छाननीत वास्तव्याचा पुरावा आणि योजनेच्या निकषानुसार सर्व कागदपत्रे असलेल्या अर्जाचा गट “अ” मध्ये आणि कागदपत्रे नसलेल्या अर्जाचा गट ‘ब’ च्या यादीत समावेश केला जाणार आहे. “अ” यादीतील रेशन कार्ड सादर केलेल्या कागदपत्राला अनुसरुन योग्य त्या वर्गवारीत (अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी यादी) पूर्ववत ठेवण्यात येणार आहे. तर “ब” यादीतील कार्डधारकांना १५ दिवसांच्या कालावधीत वास्तव्याच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे सादर करण्यास मुदत दिली जाणार आहे. मुदतीत पुरावे सादर न केल्यास आणखी १५ दिवसांची मुदत दिली जाईल. या काळातही पुरावे न दिल्यास रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे.
* खालील कोणताही एक वास्तव्याचा पुरावा जोडावा लागणार आहे.
रेशन कार्डधारक त्या भागात राहत असल्याबाबत भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, गॅस जोडणी क्रमांकाबाबत पावती, बँक पासबुक,वीज बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र व आधारकार्ड,
वरील पैकी कोणताही एक वास्तव्याचा पुरावा देण्यात यावा. दिलेला वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा.
एकाच कुटुंबात, एकाच पत्यावर दोन रेशन कार्ड देण्यात येणार नाही.
रेशन कार्डची तपासणी करताना, एका कुटुंबात व एकाच पत्यावर दोन रेशन कार्ड दिली जाणार नाहीत. अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास त्याची खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी करणार आहे.
प्रसंगी पोलिसांकडून तपासणी
संशयास्पद रेशन कार्डच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे. विदेशी नागरिकांना रेशन कार्ड दिले जाणार नाही.
अधिकारी, कर्मचा-यांचे केशरी रेशन कार्ड रद्द होणार
शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील, खासगी कंपन्यांतील कर्मचारी, कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्त्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल व अशा कर्मचा-यांकडे पिवळी, केशरी शिधापत्रिका असेल, तर ती शिधापत्रिका तात्काळ रद्द केली जाणार आहे. त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य शिधापत्रिका दिली जाणार आहे.
तरी रेशन कार्ड धारकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत रेशन धान्य दुकानदार यांचेकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!