कोंकण एक्सप्रेस
खानयाळे ग्रामस्थांच्या उपोषणाला शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांचा उपोषण स्थळी भेट देत पाठिंबा…
दोडामार्ग /शुभम गवस
तिलारी धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन सुरू आहे, या विरोधात खानयाळे ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी उपोषण स्थळी भेट देत उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच धरणाच्या परिसरात सुरू असलेल्या गौण खनिज खाणींची पाहणी देखील त्यांनी केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, तिलारी धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन सुरू असून याला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे, धरणाची संरक्षक भिंत असलेला डोंगरच गौण खनिज व्यावसायिकां कडून पोखरण्यात येत आहे. भविष्यात याचा धोका शिरंगे, खानयाळे तसेच आजूबाजूच्या गावांना आहे.
त्यामुळे प्रशासनाने तात्काळ खानयाळे ग्रामस्थांच्या उपोषणाची दखल घेत कारवाई करावी, प्रशासनाने ग्रामस्थांच्या संयमाचा अंत पाहू नये, तसेच संबंधितांवर तात्काळ कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे.