*कोंकण एक्सप्रेस*
*जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणांनी संचारला उत्साह*
*मालवणात ‘जय शिवाजी,जय भारत’ पदयात्रा जल्लोषात संपन्न*
*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*
श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणांनी आज मालवणात “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रा जल्लोषात संपन्न झाली.जिल्हा प्रशासन,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नगरी परीषद मालवण,यांचे संयुक्त विद्यमाने आज टोपीवाला हायस्कुल येथे जय ‘शिवाजी,जय भारत’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या पदयात्रा कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसिलदार वर्षा झाल्टे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, मुख्याधिकारी संतोष जिरगे, आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देताना आमदार दीपक केसरकर म्हणाले श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना आत्मसात व्हावा, त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले नाविक राजा होते. त्यांच्या नाविक दलाचे मुख्यालय विजयदुर्ग येथे होते. पहिला समुद्री किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणला बांधला. आणि आपला जिल्हा सुध्दा या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या नावाने ओळखला जातो. नौदलाचा जो ध्वज आहे त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. अशा या शूरवीर श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार आज श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त “जय शिवाजी, जय भारत”पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पदयात्रेच्या निमित्ताने आपण येथे एकत्र जमलो आहोत. हा कार्यक्रम मालवण मध्ये घेण्याचे कारण म्हणजे मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला येथे आहे. आपण सर्वजन मोठ्या उत्साहाने या पदयात्रेत सहभागी झालात आणि हा कार्यक्रम यशस्वी केलात याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.
“जय शिवाजी, जय भारत” पदयात्रेची सुरवात टोपीवाला हायस्कुल येथुन सुरु होवून मालवण नगर परिषद- भरड नाका- मुख्य बाजारपेठ- देसाई हायस्कूल- मेढा मौनिनाथ मंदिर मार्गे राजकोट असा समारोप करण्यात आला.

