*कोंकण Express*
*कणकवली तालुका स्तरिय ऑलम्पिक (गणित सुधार) स्पर्धा उत्साहात*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
अध्ययन संस्था मुंबई आणि प्राथमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली तालुक्यात शालेय गणित सुधार उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत ठराविक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पाचवीसाठी मूलभूत गणित हा घटक घेण्यात आला. या घटकाची ऑलिंपिक स्पर्धा नगर वाचनालय कणकवली येथे दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आली. या ऑलिंपिक साठी कणकवली तालुक्यातील 14 शाळांपैकी 7 शाळा उपस्थित होत्या. यामध्ये एकूण 51 विद्यार्थी 7 शिक्षक व 3 पालक उपस्थित होते. या ऑलिंपिक प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये अपूर्णांक, दशांश अपूर्णांक व विभाज्यता हे घटक प्रामुख्याने घेतले गेले. दशांश अपूर्णांकाची योग्य आकृती ओळखणे, अपूर्णांकाची योग्य आकृती ओळखणे, रिकाम्या चौकटीमध्ये योग्य ती संख्या लिहिणे, विभाज्यतेच्या कसोट्यांवर आधारित उदाहरणे, व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर व दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर, अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार व दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी यावर शाब्दिक उदाहरणे असे राऊंड्स होते. स्पर्धक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत चांगली कामगिरी दर्शवली. चतुर्थ क्रमांकासाठी टाय राऊंड झाला. दोन्ही शाळांना 80 पैकी 60 गुण होते. आजच्या कार्यक्रमासाठी पंचायत समिती गटसाधन केंद्रातील विषय तज्ञ साधन व्यक्ती श्री. तांबे सर, तसेच कणकवली विद्यामंदिर कणकवली चे मुख्याध्यापक श्री. कांबळे सर, कनेडी हायस्कूलचे शिक्षक बुराण सर उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना कनेडी हायस्कूलचे शिक्षक श्री. बुराण सर यांनी, असेच उपक्रम माध्यमिक स्तरावर देखील व्हावेत अशी आशा व्यक्त केली कामाचा अधिभार असून देखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतली. हे विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवरून लक्षात येत होते. असे गौरवपर उद्गार मान्यवरानी काढले. तसेच शिक्षकांच्या सहकार्यातूनच हा शालेय गणित सुधार उपक्रम पुढे जात असतो. नेहमीप्रमाणेच आज देखील त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यासाठी त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एकंदरीतच आजचा कार्यक्रम खूप उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. मूलभूत गणित ऑलिंपिक स्पर्धेतील पारितोषिक मिळवलेल्या शाळांची नावे पुढीलप्रमाणे:-
प्रथम पारितोषिक-
जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक 3 – 75 गुण
द्वितीय पारितोषिक –
जिल्हा परिषद शाळा नागवे नंबर 1 – 72 गुण
तृतीय पारितोषिक –
जिल्हा परिषद शाळा कलमठ कुंभारवाडी – 65 गुण
उत्तेजनार्थ पारितोषिक –
जिल्हा परिषद शाळा लोरे नंबर 1 – 60 गुण

