वेतोरे-खानोली येथील विद्युतीकरण वादाच्या भोवऱ्यात

*कोकण Express*

*वेतोरे-खानोली येथील विद्युतीकरण वादाच्या भोवऱ्यात…*

*लोकप्रतिनिधींना व ग्रामपंचायतीना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने केले जाते काम…*

*प. स. सदस्या स्मिता दामले*

वेंगुर्ले,ता.१६:

वेतोरे- खानोली भागात विद्युतीकरण कंपनीच्या वतीने सुरू असलेले काम संबंधित दोन्ही ग्रामपंचायतीना तसेच लोकप्रतिनिधीना पूर्व कल्पना न देता चुकीच्या पद्धतीने करत असल्याचा आरोप प. स. सदस्या स्मिता दामले यांनी केला, असता गटविकास अधिकारी उमा पाटील यांनी संबंधित विजवीतरणचे अधिकारी यांना याविषयी सूचना देऊन चौकशी करण्यात येईल असे सांगितले. यावर सदस्य मंगेश कामत यांनी यापुढे सर्वच खात्यांच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही कामाची पूर्वसूचना संबंधीत लोकप्रतिनिधीना द्यावी अशी मागणी आज झालेल्या प. स. मासिक सभेत केली.
वेंगुर्ले प स ची मासिक सभा उपसभापती सिद्धेश परब यांच्या अध्यक्षतेखाली प स च्या बॅ नाथ पै सभागृहात संपन्न झाली. यावेळी गटविकास अधिकारी उमा पाटील, प स सदस्य मंगेश कामत, सुनील मोरजकर, साक्षी कुबल, गौरवी मडवळ, स्मिता दामले तसेच विविध खात्याचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.
वेंगुर्ले प स सभापती अनुश्री कांबळी यांनी राजीनामा दिल्यानंतर नूतन सभापती पदाची नियुक्ती झाली नसल्याने उपसभापती सिद्धेश परब यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी प. स. च्या नूतन इमारतीच्या उद्घाटन करण्यासंदर्भात चर्चा झाली. वेंगुर्ले पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे विद्युतीकरण व फर्निचरचे काम होणे बाकी असून ही कामे पूर्ण झाल्यावर नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात यावे. इमारतीचे अर्धवट काम असताना उद्घाटन करणे योग्य नसल्याचे सांगत अर्धवट कामे पूर्ण झाल्यावरच उद्घाटन व्हावे अशी मागणी प. स. सदस्य स्मिता दामले यांनी केली. यावर विस्तृत चर्चेअंती उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी येणाऱ्या खर्चास १ लाख रुपयांची तरतूद करण्याची सूचना गटविकास अधिकारी यांनी दिली. यावेळी मागील सभेत सदस्य सुनील मोरजकर यांनी एस टी आगार प्रमुख यांची कार्यलयीन वेळ निश्चित करण्यात यावी व तशाप्रकारचा फलक लावण्यात यावा अशी सूचना केली होती. त्यावर संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची माहिती अथवा उत्तर न दिल्याने एस टी प्रतिनिधी यांना धारेवर धरत सभागृहाच्या सूचना आगार प्रमुखांना द्या असे सांगितले यावर गटविकास अधिकारी यांनी या संदर्भात आपण वरिष्ठांना लेखी पत्र पाठवणार असल्याचे सांगितले. उपसभापती सिद्धेश परब यांनी याविषयी बोलताना सांगितले की, उद्याच्या उद्या संबंधित आगार प्रमुखांनी उत्तर द्यावे अशी सूचना दिली. घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्यांना घरकुल प्रतिकृती दाखवण्यासाठी घरकुल प्रतिकृती बांधण्याचे ठरले या संदर्भात गटविकास अधिकारी यांनी योग्य निर्णय घ्यावा असे सदस्य मंगेश कामत यांनी सांगितले. बर्डफ्लू संदर्भात आता पर्यंत वेंगुर्ले तालुक्यात तशाप्रकारची नोंद झाली नसल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली. जे निराधार व बेघर आहेत अशांचे प्रस्ताव आले आहेत व ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत अशा लाभार्थ्यांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी असा ठराव करण्यात आला. तर सध्या सुरु असलेल्या वेंगुर्ले पणजी एसटीच्या फेरीत वाढ करून सायंकाळी ६.३० वाजता पणजी वेंगुर्ले बस फेरी सुरू करावी अशी मागणी सुनील मोरजकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!